नवतंत्रज्ञानामुळे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होईल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पुणे - ‘‘कमीत कमी पाणी, जमीन आणि मनुष्यबळाचा वापर करत नवतंत्रज्ञानावर आधारित तांदळाचे उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आगामी पंधरा वर्षांत जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश म्हणून अग्रेसर राहील,’’ असे मत कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा यांनी आज तांदूळ परिषदेत व्यक्त केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), इंटरनॅशनल राइस रिसर्च संस्था (आयआरआरआय), इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयएफपीआरआय)च्या संयुक्त विद्यमाने, हॉटेल शेरेटन येथे आयोजित ‘तांदूळ परिषदे’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष व्ही. शंकर, श्‍याम खडका, सीआयआयच्या अध्यक्षा अश्‍विनी मल्होत्रा आदी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, ‘‘सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत तांदळाच्या उत्पादनामध्ये पहिल्या पाच देशांमध्ये आहे. आपण दरवर्षी जवळपास १०६ लाख टन तांदूळ उत्पादित करतो. प्रति हेक्‍टर हे प्रमाण २.३९ टन इतके आहे. २०३० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारा देश असेल असा विश्‍वास वाटतो.’’ 

व्ही. शंकर म्हणाले, ‘‘शाश्‍वत विकास करायचा असेल, तर तांदूळ उत्पादनासाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. केंद्र शासनाने सध्या युरियाला अंशदान दिले आहे. पारंपरिक शेती पद्धतीसोबत नवतंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारत आशिया खंडातील सर्वाधिक मोठा तांदूळ उत्पादक देश होईल.’’