विमा हप्त्यात वाढ करण्यास रिक्षा संघटनांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : दरवर्षी तीन चाकी रिक्षाचा प्रचंड प्रमाणात वाढणारा तृतीय पक्ष विम्याचा हप्ता यंदाही जवळपास दीड हजाराने वाढण्याची शक्‍यता आहे. तसा प्रस्ताव विमा नियामक व विकास प्राधिकरणाने सादर केला आहे. त्यास रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीने विरोध केला असून तीन आसनी, तीन चाकी प्रवासी वाहनाचा स्वतंत्र व राज्यनिहाय विमा गट करावा, अशी सूचना प्राधिकरणास केली आहे. 

समितीचे राज्य सरचिटणीस नितीन पवार यांनी मागण्यांचे निवेदन प्राधिकरणाच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे. तसेच देशभरातील तीन चाकी वाहनांनी केलेल्या अपघातांची भरपाई महाराष्ट्रातील रिक्षा चालकांकडून वसूल करू नये, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कमी जोखीम कमी हप्ता, जास्त जोखीम जास्त हप्ता या विम्याच्या मूलभूत सूत्राचा भंग रिक्षा विमा हप्त्याचे दर ठरवताना होत आहे. पुणे व महाराष्ट्राचा विचार करता रिक्षांचा अपघात व नुकसानाचे प्रमाण केवळ 2 ते 3 टक्केच आहे. मात्र विमा हप्ता दरवर्षी अनेक पटींनी वाढतोय. सध्या तृतीय पक्ष विमा हप्त्यासाठी वार्षिक सुमारे साडेसहा हजार रुपये रिक्षा चालकाला भरावे लागतात.

नियमानुसार ते भरल्याशिवाय रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही. कसलाही परतावा नसलेला विमा हप्ता म्हणजे पुणे व महाराष्ट्र येथील रिक्षाचालकांची कायदेशीर लूटच आहे. आता तर त्यात आणखी दीड हजाराने वाढ करायचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला आहे. तो योग्य नाही, असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत हरकत, सूचना देऊनही विमा दरवाढ केल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

Web Title: Rickshaw unions oppose hike in third party insurance amount