भाषेचे सुवर्णलेणे सातासमुद्रापार..!

भाषेचे सुवर्णलेणे सातासमुद्रापार..!

पुणे - भाषा म्हटलं की समोर येते ती बोलणे, ऐकणे आणि संवाद साधणे, यासाठीची उपयुक्तता. परंतु, भाषेचे महत्त्व केवळ या पुरतेच मर्यादित नाही बरं का ! भाषेचे स्वतंत्र शास्त्र असते आणि त्याचा अभ्यास करून चोखंदळपणे त्यात वेगळी वाटही निवडता येते. ऋजुल गांधी नेमकं हेच साध्य करण्याच्या प्रयत्नात जागतिक स्तरावर पोचली आहे.

ऋजुलने केवळ भाषाशास्त्राची आवड जोपासली नाही, तर भाषाशास्त्राच्या (लिंग्विस्टिक) ऑलिम्पियाडमध्ये तिने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटविली. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो. अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्याचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. भाषेचे शास्त्र समजून घेत त्यातील नानाविध अवघड कोडी सोडवीत, त्यात बक्षिसे मिळवीत तिने ठसा उमटविला आहे.

चेकोस्लोव्हाकिया येथे नुकत्याच झालेल्या १६ व्या जागतिक लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड स्पर्धेत ऋजुलने सुवर्णपदक पटकावले. २००३ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. २९ देशांतील १९२ स्पर्धकांमधून ऋजुलने या सुवर्णपदकाबरोबरच ‘बेस्ट सोल्यूशन ॲवॉर्ड’ही मिळविले आहे. यंदाच्या ‘जागतिक लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड २०१८’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन पात्रता फेऱ्यांमधून तिची निवड झाली होती. 

ऋजुलने बारावीनंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) विद्यापीठात यंदा प्रवेश घेतला असून, ‘संगणकशास्त्र आणि भाषाशास्त्र’ यात पदवी घेण्याची तिची मनीषा आहे. लहानपणापासूनच तिला वाचनाची आवड आहे. सहावी आणि नववीत असताना तिने होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्य आणि ब्राँझपदक मिळविले; तर बारावीत असताना अमेरिकेतील नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमध्ये ती विजेती ठरली. भाषाशास्त्रातील स्पर्धांमध्ये सहभागी होणे, त्यात अव्वल ठरणे, एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने पुण्यातील मुला-मुलींना ‘भाषाशास्त्रा’ची आवड लागावी यांसाठी ‘लिंग्विस्टिक सर्कल’ची सुरवात केली. याद्वारे ती अनेक शालेय मुला-मुलींना ‘भाषाशास्त्रा’बद्दल अधिक माहिती देत आहे.

भाषाशास्त्राची आवड नववीत असल्यापासूनच आहे. शाळेमध्ये ओळख होणारा हा विषय निश्‍चितच नाही. परंतु, त्याचे ज्ञान मिळविण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र, भाषाशास्त्राच्या स्पर्धेत ज्ञानाबरोबरच कोडे सोडविण्यासाठीच्या क्‍लृप्त्या आणि कौशल्य महत्त्वाची ठरतात.
- ऋजुल गांधी

यातून आपण  काय घेणार?
    डोळसपणे पाहिले, तर ‘करिअर’साठी पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडेही अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
    ज्यात आवड आहे, त्यातच निष्ठेने प्रयत्न केले, तर आनंद आणि यश दोन्ही मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com