प्रस्तावित रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून मार्ग जाणार

पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या राहिलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाचे सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्‍यातून हा मार्ग जाणार असून, लवकरच तो अंतिम करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर १७० किलोमीटर लांबीचा दुसरा रिंगरोड जिल्ह्यात तयार होणार आहे.

प्रादेशिक योजनेतील रिंगरोड पीएमआरडीएने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या रिंगरोडपासून काही अंतरावरून एमएसआरडीसीकडून नव्याने रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. एमएसआरडीसीकडून दोन टप्प्यांत या रिंगरोडचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुळशी आणि मावळ तालुका वगळून अन्य तालुक्‍यांतून जाणाऱ्या सुमारे शंभर किलोमीटर लांबीच्या रिंगरोडची आणखी महामंडळाकडून तयार करण्यात आली होती. त्यास राज्य सरकारने मान्यताही दिली आहे. मात्र, पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या रिंगरोड काही गावांमध्ये ओव्हरलॅप होत असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्या वादावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.

दरम्यान, या रिंगरोडच्या उर्वरित राहिलेल्या भागाचे सर्व्हेक्षणाचे काम अमेरिकन कंपनीने पूर्ण केले आहे. मुळशी आणि मावळ या तालुक्‍यातील बारा गावांतून हा रस्ता प्रस्तावित केला आहे. ११० मीटर रुंदीचा आणि सुमारे ७० किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. हवेली तालुक्‍यातील खेड येथे हा रस्ता येऊन मिळणार आहे, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात येईल. आवश्‍यकता असल्यास काही ठिकाणी बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा जातो रिंगरोड
एमएसआरडीसीकडून प्रस्तावित करण्यात आलेला हा रिंगरोड मुळशी आणि मावळ तालुक्‍यातील पुढील गावातून जातो. परंदवडी, चांदवड, पाचणे, पिंपळवंडी, गोडांबेवाडी, लवळे, मुठा, बाहुली, सांगरून, वरदडे, खामगाव मावळ, रहाटवडे येथून जाणारा हा रिंगरोड हवेली तालुक्‍यातील खेड शिवापूर येथे मिळणार आहे.