खळखळत वाहणारे शुद्ध पाणी अन्‌ नदीकाठी शेती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

अशी हवी ‘मुठाई’; नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण

पुणे - खळखळत वाहणारे नदीतील शुद्ध पाणी... नदीकाठी करण्यात येणारी शेती... ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी असणारा ‘टॉवर’... ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार... अन्‌ नदीचे भले मोठे पात्र... आम्हाला अगदी अशीच ‘मुठाई’ हवी आहे, असे विद्यार्थ्यांनी ‘नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धे’तील सादरीकरणाद्वारे सांगितले. निमित्त आहे, ‘मुठाई नदी’ महोत्सवाचे.

जीवित नदी (लिव्हिंग रिव्हर) फाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय ‘मुठाई’ महोत्सवाचे उद्‌घाटन बुधवारी छायाचित्र प्रदर्शनाने झाले. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात मुळा-मुठा या नद्यांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ, मुठेचे गतकाळचे नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्य दाखविणाऱ्या कलाकृती, नदी काठच्या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनात १०० हून अधिक छायाचित्रांचा समावेश आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून शहरात नदीसंवर्धनासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात पर्यावरण अभ्यासक डॉ. हेमंत घाटे, विनया घाटे, पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे, डॉ. संजय खरात, प्र. के. घाणेकर, अंकुर पटवर्धन, इंदू गुप्ता, जलदिंडी प्रतिष्ठानचे डॉ. विश्‍वास येवले, सारंग यादवाडकर, शरद राजगुरू आदींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे प्रारूप बनविताना मुठेसोबत हरवलेले नातं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंत्रे यांनी, तर प्रास्ताविक फाउंडेशनच्या शैलजा देशपांडे यांनी केले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या शनिवारी (ता. २६) होणार असून, हे प्रदर्शन शुक्रवारी (ता. २५) सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

नावीन्यपूर्ण प्रारूप सादर 
या महोत्सवांतर्गत ‘आम्हाला हवी असलेली नदी’ ही नदीविकास मॉडेल स्पर्धा घेण्यात आली. यात पुण्यासह नागपूर, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांचे १६ गट सहभागी झाले. आगामी काळात नदी कशी असावी, या संकल्पनेवर आधारित नावीन्यपूर्ण नदीविकास प्रकल्पाचे प्रारूप विद्यार्थ्यांनी सादर केले आहे. यात आर्किटेक्‍चर आणि अर्बन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

Web Title: river development project format competition