औंध आयटीआयमध्ये रोबोट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक ज्ञान मिळण्याबरोबरच त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘मॅकॅट्रॉनिक्‍स’ आणि ‘रोबोटिक्‍स’ हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ९३ लाख रुपये खर्च करून संस्थेने रोबोटही घेतला आहे.

पुणे - विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक ज्ञान मिळण्याबरोबरच त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘मॅकॅट्रॉनिक्‍स’ आणि ‘रोबोटिक्‍स’ हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ९३ लाख रुपये खर्च करून संस्थेने रोबोटही घेतला आहे.

औंध आयटीआयमध्ये विशेष करून ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी ही पहिलीच संस्था आहे. सध्याच्या काळात औद्योगिक क्षेत्रात स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यासाठी प्रोग्राम तयार करणे, तसेच यंत्र अभियांत्रिकीद्वारे मशिन विकसित करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. या अभ्यासक्रमामुळे ही गरज पूर्ण होऊ शकेल.

तसेच, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात हे शिक्षण मिळणार आहे. हे अभ्यासक्रम तीन आठवड्यांचे असतील. प्रत्येक बॅचमध्ये अठरा विद्यार्थी असतील. वर्षाला ४३२ विद्यार्थी प्रशिक्षित होतील. पुणे परिसरातील तळेगाव, चाकण, रांजणगाव, भोसरी आदी औद्योगिक वसाहतींमध्ये रोबोटचा वापर होत असल्याने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकेल. या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत, असे प्राचार्य प्रकाश सायगावकर यांनी सांगितले.

संस्थेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार विजय काळे यांनी नवीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘केवळ पारंपरिक अभ्यासक्रम सुरू ठेवण्याऐवजी आम्ही परिसरातील उद्योगांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या मागणीनुसार नवे अकरा अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यात ऑटोमोटिव्ह बॉडी रिपेअरिंग-पेंट रिपेअरिंग, कॅड कॅम, क्वॉलिटी कंट्रोल आणि इन्स्पेक्‍शन आदी अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता ३१५ ने वाढविण्यात येणार आहे.’’

प्रवेशासाठी पात्रता
 आयटीआय, तंत्रशिक्षण पदविका पूर्ण केलेले विद्यार्थी आणि अभियांत्रिकी पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी.

शुल्क
 आयटीआय पूर्ण : एक हजार
 पदविका पूर्ण : दोन हजार 
 उद्योगांतील कर्मचाऱ्यांसाठी चार हजार

Web Title: robot in aundh ITI