इंटरनेटच्या बिघाडामुळे आरटीओचे कामकाज ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू असलेल्या वाहन 4.0 या संगणक प्रणालीतील अडथळे दूर करण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. इंटरनेट कनेक्‍शनमधील तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आरटीओचे कामकाज ठप्प झाले. दुपारपर्यंत हा बिघाड दूर न झाल्यामुळे अखेर पारंपरिक पद्धतीने (मॅन्युअली) कामकाज करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली.

आरटीओमध्ये "वाहन 4.0' ही अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे; परंतु या संगणक प्रणालीमध्ये सातत्याने काही ना काही अडथळे येत आहेत. परिवहन शुल्कामध्ये केलेली वाढ कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक रिक्षाचालक मोठ्या संख्येने शुल्क भरण्यासाठी येत आहेत; परंतु या प्रणालीद्वारे कामाचा वेग तुलनेने कमी असल्याने आरटीओमध्ये नागरिकांच्या रांगा लागत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. नागरिकांनी गर्दीचे फोटो थेट परिवहन आयुक्तांना व्हॉट्‌सऍपवर पाठविले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात आरटीओ प्रशासनाने विशेष प्रयत्न करत परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला; मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंटरनेट कनेक्‍शनमध्ये बिघाड झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्यामुळे वाहन पासिंगच्या पावत्या देण्यात आल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंटरनेट कनेक्‍शनचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीचे इंजिनिअर आरटीओमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दुरुस्तीचे काम केल्यानंतर सायंकाळी यंत्रणा पूर्ववत झाली. इंटरनेट कनेक्‍शनमध्ये बिघाड होण्याची ही पहिली वेळ नाही. सध्या आपत्कालिन परिस्थितीत पर्यायी इंटरनेट व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव आरटीओ प्रशासनाने यापूर्वीच परिवहन आयुक्तालयाकडे पाठविला आहे; मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Web Title: rto work stop by internet problem