सुरक्षित "व्होट बॅंके'मुळे चारही जागांवर भाजप 

सुरक्षित "व्होट बॅंके'मुळे चारही जागांवर भाजप 

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या अनुभवी चेहऱ्यांसमोर नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; मात्र अनुभवी चेहऱ्यांनी केलेली आजवरची विकासकामे, त्यांचा जनसंपर्क, प्रभागरचनेत फारसा बदल न झाल्याने सुरक्षित राहिलेली "व्होट बॅंक' याबरोबरच मोदी लाट आणि पारदर्शकतेचा मुद्दा, यामुळे सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर (क्र. 28) या प्रभागात भाजपच्या चारही उमेदवारांना आपल्या पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा रोवता आला. 

सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर या प्रभागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होती, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोनच जागांवर आपले उमेदवार उभे करता आले; मात्र शिवसेना आणि भाजपने चारही जागांवर आपापले उमेदवार उभे करून जोरदार लढत दिली. यात भाजपचे श्रीनाथ भिमाले (22,171), राजश्री शिळीमकर (18,766), कविता वैरागे (19,121), प्रवीण चोरबेले (16,059) या अख्खा पॅनेलने घवघवीत यश मिळवले. चांगले रस्ते, स्वच्छतागृहांची सोय, शाळा-उद्यानांचा विकास याबरोबरच झोपडपट्टीधारकांना दाखवलेले बदलाचे स्वप्न, यामुळे मतदारांनी भाजपच्या या उमेदवारांच्या बाजूने कौल दिला. 

"अ' गटात कविता वैरागे यांच्यासमोर कॉंग्रेसच्या शर्वरी गोतारणे यांचे आव्हान उभे होते. "ब' मध्ये भिमाले यांच्यासमोर कॉंग्रेसचे महंमद सादिक लुकडे यांनी, "क' मध्ये शिळीमकर यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्‍वेता होनराव यांनी, तर "ड' मध्ये चोरबेले यांच्यासमोर कॉंग्रेसचे युवराज शहा यांनी आव्हान निर्माण केले होते. शहा यांना तर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांचाच पाठिंबा होता; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या उमेदवारांबरोबरच इतर पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करत भाजपच्या या उमेदवारांनी आपला गड सुरक्षित ठेवला. म्हणून तर निकाल जाहीर होताच "एक नाही, दोन नाही...चार' अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. 

चोरबेले यांच्या पत्नी व माजी नगरसेविका मनीषा चोरबेले, भिमाले आणि वैरागे यांच्या जुन्या प्रभागाचा संपूर्ण भाग नव्या प्रभागात आला आहे. त्यामुळे इतर प्रभागांतील उमेदवारांसमोर जी आव्हाने उभी होती, ती या प्रभागातील उमेदवारांसमोर नव्हती. भाजपला मत देणारा पारंपरिक मतदार सुरक्षित राहिल्यामुळे भाजपच्या इथल्या उमेदवारांना निवडणूक सोपी ठरली. या भागात व्यापारी मोठ्या प्रमाणात राहतात. शिवाय, झोपडपट्टीचा भागही मोठ्या प्रमाणात आहे. यांची मते आपल्या पारड्यात पडावीत, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेने चांगलीच ताकद लावली होती. पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या होत्या. कोपरा सभा, रॅली, पत्रकांचे वाटप, सोशल मीडियाचा वापर अशी एकही संधी सोडली नाही; पण मतदारांनी भाजपला हात दिला. त्यामुळे या भागात कमळ फुलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com