β गणपतीला 'सैराट' का करता?

Ganpati
Ganpati

परवाच एका न्यूज ग्रुपवर फोटो पडला. डाऊनलोड करून पाहिला आणि हसावं की रडावं, तेच कळेना! पुण्याच्या एका उपनगरातील एका गणपती मूर्तींच्या विक्री स्टॉलवर ‘सैराट‘च्या रुपातील गणपतीच्या मूर्ती विक्रीला आल्याची ती बातमी होती आणि त्यासोबत फोटोही होता. बुलेटवर आर्चीच्या रूपात स्वार झालेली, डोळ्यांना गॉगल चढवलेली ती गणेशमूर्ती फोटोत पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. गेल्या ब्लॉगमध्ये मी दहीहंडीच्या उत्सवात शिरलेल्या गैरप्रथांबद्दल लिहिलं होतं. त्याला आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद! पण ‘सध्या केवळ हिंदूंच्याच सणांबद्दल लिहिलं जातं‘ असाही काहींचा सूर होता. त्यांच्या अभिव्यक्तीचा आदरच आहे. पण आपल्या धर्मात शिरलेल्या वाईट प्रथा डोळ्यांआड करून दुसऱ्या धर्मांतल्या प्रथा-परंपरांकडे डोकावून पाहायचं, हे कितपत योग्य आहे? 

इंटरनेटवर पाहत असताना गेल्या गणेशोत्सवाच्या काळातील एक बातमी वाचनात आली. गेल्या वर्षी म्हणजे ‘बाजीराव फेम‘ गणपती, ‘बाहुबली‘, ‘जय मल्हार फेम‘ गणपती अशा विविध रुपांतील गणेशमूर्ती बाजारात आल्या होत्या. गणपतीला स्वत:चं असं एक सुंदर रूप आहे. ते सोडायला लावून दुसऱ्याच्या रुपात जाणे भाग पाडायचे कारण काय, असा प्रश्‍न मनात आल्याशिवाय राहत नाही. 

सुंदर घडविलेल्या गणेशमूर्तींकडे पाहिलं, की मनाला आपोआपच प्रसन्नता येते. सर्वसाधारणत: आसनस्थ, उभी आणि नृत्यात रमलेली अशा तीन प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळे असले, तरीही मूळचे पावित्र्य त्यात लपत नाही. पुण्याचा त्रिशुंड गणपती असो वा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती असो किंवा लालबागच्या राजाची भव्य मूर्ती असो, पाहिलं की हात आपोआप जोडले जातात. 

मध्यंतरी ज्ञानेश्‍वरीची 14 व्या शतकात केलेल्या एका नकलेची छायाचित्रे पाहण्यात आली. त्यात ज्ञानेश्‍वरीमध्ये वर्णन केलेला सहा हातांचा गणेश चितारण्यात आला आहे. हे चित्र पाहायलाही सुंदर वाटतं. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात म्हणजे गांधीजी, पंडित नेहरू यांच्या रुपातल्या गणेशमूर्ती पुण्याच्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या मांडवात विराजमान झाले होते. ते दिवस वेगळे होते. प्रत्येकाला कुणाच्या रुपात देव दिसेल, हे सांगणे महाकठीण.. 

गणराया लवकर येई I भेटी सकलासी देई II 
अंगी सिंदुराची उटी I केशर कस्तुरी लल्लाटी II 
पायी घागऱ्या वाजती I नाचत आला गणपती II 
तुका म्हणे पाही I विठ्ठल गणपती दुजा नाही II 

असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजच म्हणतात.. 

या सगळ्याला एक पावित्र्य आहे, मनापासूनच्या भावना आहेत. पण म्हणून ‘सैराट‘ गणपती, ‘बाहुबली‘ गणपती, ‘जय मल्हार‘ गणपती, डायनासॉरवर बसलेला गणपती? 

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. म्हणजे निर्जीव मूर्तीत प्राण ओतले जातात. त्या दिवशी अशा विचित्र मूर्तींसमोर आरसा ठेवला, तर ती मूर्ती नक्की म्हणेल, ‘तुमच्यातला सैराटपणा कमी करण्यासाठीच मी आहे. पण म्हणून तुम्ही मलाच ‘सैराट‘ बनवाल? माझं तुंदीलतनू, लंबोदर, चार आयुधे धारण केलेले रूप किती छान आहे.. तुम्ही दिलेले मोदक मी खायचे की बुलेटचे हॅंडल सांभाळायचे? बाबांनो, राहू द्या ना मला माझ्या मूळ रूपात..!‘

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com