विद्यार्थी, शिक्षकांची अभूतपूर्व गर्दी

विद्यार्थी, शिक्षकांची अभूतपूर्व गर्दी

पुणे - दहावीचं वर्ष आहे; अभ्यासक्रमही बदललाय, मग परीक्षेला सामोरं कसं जावं, अभ्यास कसा करावा, परीक्षेचं नियोजन कसं करावं, असे असंख्य प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या मनात होते. ‘सकाळ’च्या माध्यमातून आज त्यांची उत्तरे त्यांना मिळाली आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आलेलं ‘दहावी’चं टेन्शन गळून पडलं.

दहावीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने टिळक स्मारक मंदिर येथे मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला शेकडो पालक, विद्यार्थी आणि  शिक्षकांनी गर्दी केली होती. सभागृह, बाल्कनी हाउसफुल्ल झाली, तरीही कार्यशाळेला येणाऱ्या गर्दीचा ओघ कमी होत नव्हता. सभागृहातील मोकळ्या जागेत बसून विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. असंख्य पालक टिळक स्मारक मंदिराच्या मोकळ्या जागेत उभे होते. इंग्रजी, गणित, विज्ञान या प्रमुख विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, उमेश प्रधान, डॉ. दिलीप जोग, डॉ. सुषमा जोग, प्राजक्ता गोखले, डॉ. श्रुती चौधरी या तज्ज्ञांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाबाबत असलेली चिंता दूर करीत त्यांना टिप्स दिल्या. अभ्यासक्रम बदलाची गरज, समाविष्ट संकल्पना, कृतिपत्रिका त्याचे प्रकार तसेच कृतिपत्रिका सोडविण्याचे तंत्र विषद केले.

‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक सम्राट फडणीस, सरव्यवस्थापक (वितरण) डॉ. सुनील लोंढे, सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत आदी या वेळी उपस्थित होते. फडणीस यांनी ‘सकाळ’ अभ्यासमाला आणि या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत ‘सकाळ’ची भूमिका स्पष्ट केली. ‘‘परीक्षेचे ओझे विद्यार्थ्यांबरोबर पालकांवरही असते. त्याचा ताण कमी करण्यासाठी ‘सकाळ’चा हा प्रयत्न आहे. येत्या काळात आणखी कार्यशाळा घेण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही दहावीचे मार्गदर्शन पोचविण्यात येईल,’’ असे त्यांनी सांगितले.

उमेश प्रधान, शिक्षणतज्ज्ञ 
कृतीत सर्जनशीलता आणि उपयोजन असते. त्यामुळे सर्व विषयांसाठी असणाऱ्या कृतिपत्रिकेमुळे बौद्धिक आणि मानसिकतेला वाव.
यापूर्वीच्या प्रश्‍नपत्रिका ताणतणाव निर्माण करणाऱ्या, पाठांतरावर भर देणाऱ्या आणि अपेक्षित उत्तर असणाऱ्या होत्या. 
आता कृतिपत्रिका अनपेक्षित उत्तरे, उपयोजना, जीवनाधिष्ठित मूल्यावर आधारित असणार आहेत. 
दहावीच्या अभ्यासाचे नियोजन योग्यरीत्या करणे आवश्‍यक आहे. परीक्षेचा साधारण कालावधी लक्षात घेऊन ‘काउंट डाऊन’प्रमाणे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. 
वर्तमानपत्रांचे वाचन महत्त्वाचे ठरणार आहे. पालकांनी मुलांना वर्तमानपत्रे नियमित वाचून दाखवावीत.

डॉ. दिलीप जोग, शिक्षणतज्ज्ञ
पालकांनी मुलांचे रिमोट कंट्रोल होऊ नये, त्यांच्या पद्धतीने अभ्यास करू द्यावा. त्यांच्या अभ्यासावर लक्ष मात्र ठेवावे.
परीक्षेतील गुणांवर भर न देता पालकांनी मुलांना विषय आणि त्यातील संकल्पना किती समजल्या, यावर भर द्यावा.
ज्ञान मिळविणे, हे ध्येय हवे. विषय समजून घेतला, की कोणतीही कृतिपत्रिका समोर आली, तरीही ती सहज सोडविता येईल. 
दहावीचा अभ्यास करताना सातवी, आठवी आणि नववीची पाठ्यपुस्तकेही जवळ ठेवा. ही पाठ्यपुस्तके एकमेकांशी संलग्न आहेत.
विज्ञानाचा अभ्यासक्रम यापूर्वी पाठांतर करून केला जात असे. आता ते अशक्‍य असून, कृतिशीलता, प्रयोगशीलता याची जोड आवश्‍यक. हाच अधिक गुण मिळविण्याचा मार्ग.

अभ्यासक्रमातील बदल कोणते आहेत, विद्यार्थ्यांनी त्याला कसे सामोरे जायचे, अभ्यास कसा करावा, याचे संपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेतून मिळाले आहे. विद्यार्थीच नव्हे; तर शिक्षक आणि पालकांनादेखील या कार्यशाळेतून तज्ज्ञांचे विचार खूप उपयुक्त ठरतील. या कार्यशाळेमुळे शिक्षक कृतीतून शिक्षण देण्यास सुरवात करतील.
- हरिश्‍चंद्र ढसाळ, शिक्षक

डॉ. सुषमा जोग, रसायनशास्त्र तज्ज्ञ
अभ्यास समजून केल्यास कोणताही प्रश्‍न आला, तरी गोंधळ उडणार नाही. नव्या अभ्यासक्रमामुळे मुलांना चांगले ज्ञान, शिक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. 
पूर्वज्ञान आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक विद्यार्थी आपले ज्ञान विकसित करत असतो. या प्रक्रियेला अभ्यासक्रमात वाव.
समर्पणवृत्तीने प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही वाचावे. शिकण्याचा आनंद आणि सहज शिक्षण हे यातून साध्य होईल.

विद्यार्थी गाइड वापरतात. पण पाठ्यपुस्तक किती महत्त्वाचे आहे, हे या कार्यशाळेतून समजले. मुलांनी पुस्तकांचे वाचन खूप केले पाहिजे. त्यामुळे परीक्षेतील कोणताही प्रश्‍न त्यांना सहज सोडविता येईल. पालकांच्या दृष्टीनेही ही कार्यशाळा मोलाची आहे. परीक्षेचे नियोजन कसे करावे, अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मिळाले.
- आशा कुंभार, पालक

डॉ. श्रुती चौधरी, शिक्षण अभ्यासक
तणावमुक्त करणारा हा अभ्यासक्रम असून, जीवनकौशल्य विकसित करण्यास मदत होईल. दहावीचे वर्ष असल्यामुळे  कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमांना मुलांना घेऊन जाणे टाळू नये.
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला, वर्णनात्मक लिखाणाला आणि स्वत:ची मते मांडण्याला महत्त्व असेल.
साचेबद्ध चाकोरीबाहेर पडून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करा. पाठ्यपुस्तकातील उपक्रमांना विशेष महत्त्व असून, त्यावर भर द्या.
कृतिपत्रिकेत उपक्रमांवर आधारित प्रश्‍न विचारले जाणार नसले, तरीही हे उपक्रम विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, अवांतर वाचन वाढवतील. त्याचा उपयोग कृतिपत्रिकेतील अन्य प्रश्‍न सोडविण्यास होईल.

‘सकाळ’चा हा उपक्रम आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे आम्हाला अभ्यासक्रमाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. अभ्यास कसा करावा, कोणताही ताण न घेता परीक्षा कशी द्यावी, याचे तंत्र ‘सकाळ’मुळे समजले. हे मार्गदर्शन दहावीलाच नाही, तर पुढील आयुष्यातही उपयोगी ठरेल.
- पूजा जाधव, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com