'माणसाला जगण्याच्या प्रेरणा माणसंच देतात '

phirasit book publication
phirasit book publication

पुणे - ""जखमांमधून नुसत्या वेदनाच जन्माला येत नाहीत; तर ताजी, टवटवीत, सुगंधित फुलेही जन्माला येत असतात. या जखमांकडे तुम्ही पाहता कसे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ही फुले पाहून माणसाला जगण्याच्या प्रेरणा माणसेच देत असतात, हे तुम्हाला कळेल...,'' अशा शब्दांत श्रोत्यांशी संवाद साधत आणि त्यातून जगण्याची ऊर्मी वाढवत होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे. 
"सकाळ'च्या सप्तरंग पुरवणीतील त्यांचे "फिरस्ती' हे सदर "सकाळ प्रकाशना'ने पुस्तकरूपात नुकतेच आणले आहे. यानिमित्ताने सकाळ प्रकाशन आणि शुभम प्रकाशन यांच्या वतीने "फिरस्ती : एक संवादयात्रा' हा कार्यक्रम आयोजिला होता. यात कांबळे यांच्यासह त्यांच्या सदरातून समाजासमोर आलेले खरेखुरे नायक जिवाजी वाघमारे, शीतल चव्हाण, प्रा. सदानंद भोसले हेही सहभागी झाले होते. त्यामुळे "फिरस्ती'ची वाटचाल उलगडत गेली. 

""दु:ख म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी, दु:ख मांडण्यासाठी आणि दु:खमुक्त समाज करण्यासाठी "फिरस्ती' लिहू लागलो. या सदरातील नायकांनी आपल्या आयुष्यात जितके कष्ट केले, तितकेच कष्ट मलाही त्यांना शोधण्यासाठी घ्यावे लागले. त्यासाठी महाराष्ट्रात सगळीकडे सतत फिरावे लागले. या कष्टातून, प्रयत्नातून जन्माला आलेल्या या सदराला महाराष्ट्रातलेच नव्हे तर परदेशातलेही असंख्य मराठी वाचक मिळाले. अनेक घरात या सदराचे सामूहिक वाचन होते. ज्या नायकांवर लिहिले गेले त्यांना समाजाने भरभरून मदतही दिली. शेवटी सुंदर समाज, समृद्ध समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. 
"फिरस्ती' सदरात आमचे जगणे आले, त्या दिवसापासून अंधारातून प्रकाशात आल्याची भावना आमच्या मनात आहे, असे भोसले, वाघमारे, चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले. "सकाळ प्रकाशना'च्या ऐश्‍वर्या कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल ओंबासे यांनी आभार मानले. 

मी नेहमी उलटा विचार करतो. त्याशिवाय आयुष्य सुलटे करता येणार नाही, हा विचार समोर ठेवून लिहू लागलो. म्हणून तर माझ्या साहित्याला कल्पनेचे नाही तर वास्तवाचे पाय आहेत. ज्या माणसांना मराठी साहित्यात कधीही स्थान मिळाले नाही, जे जगण्याची तुतारी वाजवून लढण्यासाठी सतत तयार असतात अशा माणसांसाठी मला लिहायचे होते आणि मराठी साहित्यातील पोकळी भरून काढायची होती. "फिरस्ती' हे सदर त्याचाच एक भाग आहे. 
- उत्तम कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष 

सवलतीत मिळवा पुस्तकसंच 
"फिरस्ती' हे सदर सकाळ प्रकाशनाने पुस्तकरूपात नुकतेच आणले आहे. "एक पोकळी असतेच', "उजेड- अंधाराचं आभाळ', "श्‍वास आणि भास' या "फिरस्ती'मधील लेखांचे संकलन असलेली तीन देखणी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध झाली आहेत. हा पुस्तकसंच 30 टक्के सवलतीत "शुभम साहित्य'च्या प्रदर्शनात उपलब्ध करून दिला आहे. आचार्य अत्रे सभागृह येथे हे प्रदर्शन सुरू आहे. अधिक माहितीसाठी "सकाळ'च्या (020) 24405678, 8888849050 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com