चांडोह वन विभागात चंदनाची कत्तल

युनूस तांबोळी
शनिवार, 26 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील चांडोह येथील वन विभागात राजरोसपणे चंदनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. झाडे लावण्याचा वन विभागाचा उपक्रम सुरू असतानाच, या परिसरात चंदनाची झाडे तोडली जात आहेत. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील चांडोह येथील वन विभागात राजरोसपणे चंदनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. झाडे लावण्याचा वन विभागाचा उपक्रम सुरू असतानाच, या परिसरात चंदनाची झाडे तोडली जात आहेत. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

चांडोह येथे वनक्षेत्र मोठे आहे. मागील काही काळापासून या क्षेत्रात झाडे लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसून येतात. झाडे वाढल्याने या क्षेत्रात वन्यजीवांना राहण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत आहे. घोड नदीचा परिसर असल्याने या नदीच्या पात्राचा या वन विभागाला उपयोग करून घेता येतो. तसेच वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता करून देण्यास मदत होते. घोड नदीचा किनारा या वन विभागाला असल्याने बिबट्यासारखा प्राणी या परिसरात वास्तव्य करून राहताना दिसतो. वन विभागात झाडे बहरू लागल्याने मोरांचे प्रमाण अधिक असल्याचे येथील ग्रामस्थ आवर्जून सांगतात. या परिसराला झाडांमुळेच महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. वन विभागाच्या या क्षेत्रात चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांची देखभाल करणे वन विभागाचे कर्तव्य आहे. असे असताना मात्र, या वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चंदनाच्या झांडाची कत्तल होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या राजरोसपणे चंदनाच्या झाडांची छाटणी करून चंदन काढून घेतले जात आहे. त्यामुळे येथील चंदनाची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या भागात वन विभागाचे कर्मचारी देखभाल करण्यासाठी असतात. तरीदेखील या चंदनचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. तत्काळ या भागातील वनक्षेत्राची पाहणी करून संबंधितांची चौकशी करण्यात यावी; अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. याबाबत वन विभागाचे अधिकारी तुषार ढमढेरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कुंपणच खातेय शेत...
वन विभागातील झाडांची देखभाल केल्यास वन्यजीवांचा आडोसा होणार आहे. त्यातून वेगवेगळ्या प्राण्यांची नैसर्गिक उत्पत्ती होऊन वन्यजीवांना भक्ष मिळण्यास मदत होणार आहे. असे असताना वन विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. चंदन चोरीला पाठीशी घालून आर्थिक संबंध मोठ्या प्रमाणात जुळवणी केल्याची चर्चा या भागातील नागरिक करत आहेत.

Web Title: Sandalwood slaughter in Chandoh forest division