"आरटीओ' कार्यालयाचा महसूल "ओव्हरलोड' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सांगली - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संपलेल्या आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट 94 कोटी 10 लाख इतके असताना तब्बल 110 कोटी 30 लाख रुपये महसूल गोळा केला. उद्दिष्टापेक्षा 117 टक्के जास्त महसूल गोळा करताना विभागात अव्वल क्रमांकही पटकावला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

सांगली - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संपलेल्या आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट 94 कोटी 10 लाख इतके असताना तब्बल 110 कोटी 30 लाख रुपये महसूल गोळा केला. उद्दिष्टापेक्षा 117 टक्के जास्त महसूल गोळा करताना विभागात अव्वल क्रमांकही पटकावला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

ते म्हणाले,""आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये उद्दिष्ट 79 कोटी रुपये होते. तेव्हा 88 कोटी रुपये महसूल वसूल केला होता. तर संपलेल्या आर्थिक वर्षात 94 कोटी 10 लाख उद्दिष्ट असताना 110 कोटी 30 लाख रुपये वसूल करण्यात आले. 88 कोटींवरून 110 कोटी 30 लाख रुपये वसुलीचे प्रमाण पाहिले तर 125 टक्के जास्त महसूल जमा झाला. नवीन दुचाकी आणि चारचाकी "चॉईस नंबर' साठी 5337 वाहनधारकांकडून चार कोटी 36 लाख रुपये मिळाले. वायुवेग पथकाने विविध गुन्ह्यात दंडात्मक कारवाईत सात कोटी 67 लाख रुपये वसुली केली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या 570 वाहनांकडून एक लाख 78 हजार रुपये दंड वसूल केला. तर 982 वाहनांवर गुन्हे दाखल करून एक कोटी 57 लाख दंड वसूल केला.'' 

श्री. वाघुले म्हणाले,""आरटीओ कार्यालयामार्फत 510 ऑटो रिक्षांवर कारवाई करून 11 लाख 70 हजार रुपये दंड गोळा केला. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 143 वाहन धारकांवर नियमभंग केल्याबद्दल कारवाई करून 4 लाख 21 हजार रुपये वसूल केले. पोलिस आणि आरटीओ कार्यालयाने ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात संयुक्तपणे 254 वाहनांवर कारवाई केली. त्यांना परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 745 वाहनांवर कारवाई करून 13 लाख 74 हजार रुपये दंड वसूल केला. त्याचप्रमाणे 725 वाहन धारकांचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला. 

राज्यातील ठरावीक जिल्ह्यातच वाहन 4.0 आणि सारथी 4.0 ही सॉफ्टवेअर प्रणाली सुरू आहे. सांगलीतही ती सुरू झाली आहे. वाहन परवाना काढण्याची पद्धत ऑनलाइन केली आहे.'' मोटार वाहन निरीक्षक सचिन विधाते यावेळी उपस्थित होते. 
 

महसूल वसुली- 
आरटीओ कार्यालयात विविध प्रकारच्या फीद्वारे 11 कोटी 96 लाख रुपये, दंडात्मक कारवाईतून 6 कोटी 50 लाख रुपये, करातून 75 कोटी रुपये आणि रस्ता सुरक्षा निधीतून 66 लाख रुपये, पर्यावरण करातून 1 कोटी 65 लाख रुपये आणि इतर माध्यमातून मिळून 110 कोटी 30 लाख रुपये वसूल करण्यात आले. विभागात कोल्हापूर- 113 कोटी, सातारा-106 कोटी, कऱ्हाड- 100 कोटी याप्रमाणे महसूल वसूल झाला. त्यामुळे सांगलीने प्रथमच 100 कोटींचा टप्पा पार करताना विभागात अव्वल क्रमांकही मिळवला. 

Web Title: sangli rto office