देहूत आज बीज सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

देहूरोड - संत तुकाराम महाराज बीज सोहळा मंगळवारी (ता. १४) साजरा होत असून, त्यासाठी देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थान व ग्रामपंचायतीसह सरकारच्या विविध विभागांनी तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून दिंड्या व वारकरी दाखल झाले असून, ठिकठिकाणी ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा गजर सुरू आहे. 

देहूरोड - संत तुकाराम महाराज बीज सोहळा मंगळवारी (ता. १४) साजरा होत असून, त्यासाठी देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थान व ग्रामपंचायतीसह सरकारच्या विविध विभागांनी तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून दिंड्या व वारकरी दाखल झाले असून, ठिकठिकाणी ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा गजर सुरू आहे. 

बीज सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित केले असल्याचे देहू संस्थानतर्फे सांगण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे, विश्‍वस्त सुनील दा. मोरे, सुनील दि. मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे यांनी सोहळ्याचे संयोजन केले आहे. 

देहू ग्रामपंचायतीची तयारी
देहू ग्रामपंचायतीने वैकुंठ गमन मंदिर परिसर, इंद्रायणी घाट व गावातील गटारांची स्वच्छता केली आहे. जंतुनाशकाची फवारणी व धुरळणी केली आहे. वारकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाहारगृहे आणि दिंड्या यांना तीन हजार मेडिक्‍लोर बाटल्यांचे वाटप केले आहे, असे ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाण्याचे १२ टॅंकर पुरविले आहेत. प्रशासनाने ८१ स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. आरोग्य केंद्राने मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर व गाथा मंदिरात बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत. तातडीच्या सेवेसाठी १०८ क्रमांकाच्या तीन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. आठ आरोग्यसेवक व चार आरोग्य सहायक कार्यरत आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी माधवी होदेकर यांनी सांगितले. सोहळ्यासाठी तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

असा होईल बीज सोहळा
पहाटे ३ : मुख्य मंदिरात काकडा आरतीने बीज सोहळ्यास प्रारंभ
पहाटे ४ : अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजाआणि विश्वस्त व वारकरी जोडप्याच्या हस्ते शिळा मंदिरातील महापूजा
सकाळी ६ : वैकुंठस्थान मंदिरात तुकोबांची महापूजा 
सकाळी ६.३० : तुकोबारायांच्या पादुका पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान 
पालखी वैकुंठस्थान मंदिरात पोचल्यानंतर प्रदक्षिणा व पादुका मंदिरात ठेवण्यात येतील
सकाळी १० : संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन प्रसंगावर देहूकर महाराजांचे कीर्तन 
दुपारी १२ : विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते तुकोबांची आरती आणि वैकुंठ गमन स्थान मंदिर व नांदूरकीच्या वृक्षाच्या दिशेने फुलांचा वर्षाव 
दुपारी १२ नंतर : पालखी परत मुख्य मंदिराकडे मार्गस्थ

Web Title: sant tukaram bij