‘ससून’ घेणार अर्भकांचीही दक्षता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) ससून रुग्णालयात विकसित केला आहे. तो राज्याच्या सरकारी रुग्णालयांपैकी सर्वांत मोठा आणि आधुनिक अर्भक अतिदक्षता विभाग ठरला असून, ‘सरकारी-खासगी भागीदारी’चे (पीपीपी) सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे - अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) ससून रुग्णालयात विकसित केला आहे. तो राज्याच्या सरकारी रुग्णालयांपैकी सर्वांत मोठा आणि आधुनिक अर्भक अतिदक्षता विभाग ठरला असून, ‘सरकारी-खासगी भागीदारी’चे (पीपीपी) सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

ससून रुग्णालयात ५९ खाटांचे ‘एनआयसीयू’ उभारले आहे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि कंपन्यांनी दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या देणगीतून हे साकारल्याची माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली. फिनोलेक्‍स प्रायव्हेट लिमिटेड व त्याच्याशी संलग्न मुकुल माधव फाउंडेशन, श्रीमंत गणपती हलवाई गणपती ट्रस्ट, कमिन्स इंडिया, सुझलॉन एनर्जी, सिसका एल. ई. डी. या कंपन्यांनी दिलेल्या देणगीतून हा विभाग साकारला आहे.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी यात मोलाची मदत केली. फाउंडेशनचे स्वयंसेवक सचिन कुलकर्णी म्हणाले, ‘‘खासगी रुग्णालयातील ‘एनआयसीयू’चा खर्च सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. गरीब रुग्णांना ही सेवा उपलब्ध व्हावी, यासाठीच ससूनमधील ‘एनआयसीयू’ अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज केले आहे. याच्या देखभालीसाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात येत आहे.’’ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. उदय राजपूत म्हणाले, ‘‘अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी हा अतिदक्षता विभाग सुसज्ज केला आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या अर्भकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतील.’’

अतिदक्षता विभागामुळे ‘ससून’ने रुग्णसेवेचा आणखी एक टप्पा गाठला आहे. गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांना खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा परवडत नाही, अशांना ससून रुग्णालय हा चांगला पर्याय ठरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि अद्ययावत उपकरणे हे याचे बलस्थान आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

असे आहे ‘एनआयसीयू’
 अत्यवस्थ अर्भकांवर उपचारासाठी अत्यावश्‍यक सर्व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज
 व्हेंटिलेटरपासून ते हृदयाचे ठोके, ‘ईसीजी’ काढण्याची सुविधा
 अशक्त, वजन वाढत नसलेल्या अर्भकांसाठी स्वतंत्र विभाग
 मुलांचे वजन दीड किलोपर्यंत वाढण्यासाठी आवश्‍यक उपचार
 आईला बाळाजवळ झोपता येईल अशी व्यवस्था

Web Title: sasoon hospital