'ससून'चा परिसर लोकसहभागातून स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

महापालिका करणार अंतर्गत रस्ते 
ससून रुग्णालयात पुणे शहर व परिसरातील हजारो रुग्ण दररोज दाखल होतात. रुग्णालयाच्या अंतर्गत रस्त्यांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे हे रस्ते पुणे महापालिकेच्या वतीने करून देण्यात येतील, अशी घोषणा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केली.

पुणे : सरकारी रुग्णालय म्हटले की अस्वच्छता, असुविधा ही प्रतिमा बदलण्यासाठी ससून रुग्णालयात 'स्वच्छ ससून, प्रसन्न ससून' हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी ससून रुग्णालयाची मुख्य इमारत आणि इमारतीच्या आसपासचा परिसर लोकसहभागातून स्वच्छ करण्यात आला. हे अभियान 20 एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार असून, त्यात राजकीय कार्यकर्त्यांसोबत विविध सामाजिक संघटना, उद्योग समूह सहभागी झाले आहेत. 

ससून अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हे अभियान सुरू केले आहे. त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. महापौर मुक्ता टिळक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, महापालिकेचे उपायुक्‍त सुरेश जगताप, अभ्यागत मंडळाचे सदस्य संभाजी पाटील, मुकुंद गोळे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. अजय तावरे, डॉ. मुरलीधर तांबे आदी या वेळी उपस्थित होते. 

या अभियानात भाजपच्या नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, प्रजापती ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयाचे स्वयंसेवक, ससूनच्या परिचारिका, विद्यार्थी डॉक्‍टर सहभागी झाले होते. बीव्हीजी ग्रुप तसेच सीएलआर ग्रुपचे कर्मचारीही अभियानात स्वच्छतेच्या आधुनिक साहित्यासह सहभागी झाले होते. त्यांनी ससून अंतर्गत इमारत, स्वच्छतागृहांची स्वच्छता केली, तर सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी परिसरात स्वच्छता करून सुमारे तीन ट्रक कचरा काढला. हे अभियान संपल्यानंतरही ससूनचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येईल, असे खासदार शिरोळे यांनी सांगितले.