... अन्‌ हुरहुरलेली मनं म्हणाली "सायोनारा सवाई' !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे : आदल्या दिवशीच्या तब्बल आठ तासांच्या आणि मध्यरात्री बारापर्यंत सुरू असलेल्या एकापेक्षा एक अशा स्वराविष्काराशी संमुख झाल्यानंतर रविवारी "सवाई'च्या मंडपात रसिकांची पावलं पडली, तिच मुळी हुरहुरलेली मनं सोबतीला घेऊन. गेले पाच दिवस रसिकांच्या श्रुती ओथंबून टाकणाऱ्या या महोत्सवाची आज सांगता होत असल्यामुळे एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात आसू घेऊनच रसिक अखेरच्या दिवसाचा आस्वाद घेत होते.

पुणे : आदल्या दिवशीच्या तब्बल आठ तासांच्या आणि मध्यरात्री बारापर्यंत सुरू असलेल्या एकापेक्षा एक अशा स्वराविष्काराशी संमुख झाल्यानंतर रविवारी "सवाई'च्या मंडपात रसिकांची पावलं पडली, तिच मुळी हुरहुरलेली मनं सोबतीला घेऊन. गेले पाच दिवस रसिकांच्या श्रुती ओथंबून टाकणाऱ्या या महोत्सवाची आज सांगता होत असल्यामुळे एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात आसू घेऊनच रसिक अखेरच्या दिवसाचा आस्वाद घेत होते. संतूर आणि सरोदसारख्या वाद्यांनी या दिवसावर चढवलेला साज, त्याला असणारी दिग्गजांच्या गायनाची साथ, उस्ताद अमजद अली खॉं यांनी रसिकांना अगदी तृप्त तृप्त करत रुजवलेली वादनसेवा आणि जपानी कलाकार ताकाहिरो अराई यांच्या रूपात बांधला गेलेला दोन देशांतील सांस्कृतिक पूल... अशा स्वरमयी वातावरणात रसिकांनी यंदाच्या महोत्सवाला "सायोनारा' म्हणतच निरोप घेतला...

आज रसिकांना यंदाच्या महोत्सवातल्या सर्वाधिक उत्कंठा लागून राहिलेल्या कलाकारांपैकी एका युवा जोडीला अर्थात, अमजद अली खॉं यांचे पुत्र सरोदवादक अमान आणि अयान अली बंगश यांना ऐकता आलं. आपल्या अप्रतिम सादरीकरणाने या बंधूंनी रचलेल्या पायावर त्यांचे पिताजी अमजद अली खॉं यांनी अक्षरशः कळस चढवला. तरुण तडफदार वादन आणि नेमस्त अवस्थेला पोचलेलं वादन यातला आगळा फरकही या वेळी रसिकांना अनुभवता आला.

सायंकालीन राग "पूरीया कल्याण' हा अमान-अयान बांधवांनी आपल्या वादनासाठी निवडला होता. श्रोत्यांना त्याचा परिणाम अनुभवता यावा, यासाठी या वेळी त्यांच्या विनंतीवरून मंडपातले दिवे अर्धे मालवण्यात आले होते. ते जणू कुठल्याशा अज्ञात स्वरतत्त्वाचा शोध घेऊ पाहत असल्याचा परिणाम त्यांच्या वादनात अनेकदा जाणवून आला. आधीच शेवटचा दिवस आणि त्यात सरोदवर "पूरीया कल्याण'चा विरहालाप... यामुळे मंडपातलं वातावरण अंतर्मुख करणारं झालं होतं. आपल्या मुलांनंतर मंचावर आलेल्या अमजद अली खॉं यांनी क्षणातच आपल्या अनन्यसाधारण साधनेची प्रचीती रसिकांना करून दिली. राग "जिला काफी' आणि राग मालिका "कानडा'वर आधारित काही अनवट रचना त्यांनी सरोदवर वाजवल्या. शिवाय, एक अप्रतिम तराणा वाजवतानाच गाऊनही दाखवला. रवींद्रनाथांच्या "एकला चलो रे' या अजरामर रचनेने त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली.

त्याआधी या दिवसाची सुरवात पंडित शिवकुमार शर्मा यांचे जपानी शिष्य ताकाहिरो अराई यांच्या संतूरवादनाने झाली. उणंपुरं तासभरच काय तेवढं वादन ताकाहिरो यांना वादन करायला मिळालं; पण त्यातही त्यांनी रसिकांना आपल्या वादनाचा भरभरून आनंद घेऊ दिला. प्रेमाचा; प्रणयाचा म्हणून ओळखला जाणारा आणि माधुर्यासाठी परिचित असणारा असा राग "मधुवंती' त्यांनी निवडला होता. त्याचीच विलंबित आणि द्रुत रूपं त्यांनी अलगद उलगडून दाखवली.
त्यानंतर मंचावर आलेल्या आणि वरच्या पट्टीतलं पल्लेदार आणि हुकमी गायन आणि मधुर आवाजासाठी जे ओळखले जातात, अशा पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी राग "पट्टदीप'मध्ये सादरीकरण सुरू केलं. त्यांनी तराणा आणि त्याच चालीवर गुफलेलं गायन असा एकत्र अनुभव श्रोत्यांना दिला; मात्र त्यांनी "मुह बंद तान' (तोंड बंद असताना घेतलेल्या ताना) ही खास गायनशैली जेव्हा सादर केली, तेव्हा उपस्थितांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.

ताकाहिरो चक्क मराठीत बोलला
"तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी माझं गायन सुरू करतोय', अशा अस्खलित मराठी भाषेत जपानी कलाकार ताकाहिरो यांनी रसिकांशी संवाद साधला आणि आश्‍चर्यभरीत मंडपातून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्यांनी नंतर हिंदीतही बोलत आपण भारतात किती रुळलो आहोत, याचा दाखला दिला.

घड्याळाचं टेन्शन आणि आवरतं सादरीकरण !
ताकाहिरो आणि कैवल्यकुमार गुरव हे सतत घड्याळावर लक्ष ठेवून सादरीकरण करताना दिसून आले. "नंतरच्या कलाकारांचा मान ठेवायचा आहे. पुढच्या वेळी नक्की जास्त वाजवू', अशा प्रतिक्रिया या कलाकारांनी रसिकांच्या आग्रहाला दिल्या. त्यामुळे या घड्याळाच्या "टेन्शन'विषयी रसिकांत चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून "सवाई'त शेवटच्या दिवसाचं शेवटचं सादरीकरण हे डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाचं असतं; मात्र शेवटच्या सत्रात गायनाला पुरेसा वेळ मिळत नसल्याने अत्रे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यंदा हे घडू नये, म्हणून त्यांच्याआधी असणाऱ्या कलाकारांना कमी वेळ देण्यात आला की काय, अशी चर्चा होती.
 

प्रभाताईंना श्रोत्यांची उभं राहून दाद
शब्दशः गायनाचा पूर्णानुभव देणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने यंदाच्या "सवाई'ची सांगता झाली. राग "श्‍याम कल्याण'ने आपल्या गायनाची सुरवात करत "मंगल नाम श्री गणेश' ही बंदिश त्यांनी ऐकवली. यानंतर सादर झालेल्या "गजवदना हे गणराया पुरी करो कामना' या द्रुत रचनेच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या शिष्यांनी दिलेली साथ गायनाचा परिणाम अधिक वाढवत होती. डॉ. अत्रे यांचं गाणं आपल्या कानांत साठवून घेऊनच मंडपातील प्रत्येक जण घरी निघाला...