डायबेटिसमुळे पाल्याला प्रवेशास शाळेचा नकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - एकीकडे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून "डिस्लेक्‍सिया' आणि "टॉटेड सिंड्रोम' अशा वैद्यकीय समस्या किंवा आजारांविषयी जनजागृती होत असताना, दुसरीकडे मात्र विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात "टाइप वन डायबेटिस' असल्यामुळे एका साडेपाच वर्षीय पाल्याला शाळेत प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. 

पुणे - एकीकडे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून "डिस्लेक्‍सिया' आणि "टॉटेड सिंड्रोम' अशा वैद्यकीय समस्या किंवा आजारांविषयी जनजागृती होत असताना, दुसरीकडे मात्र विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात "टाइप वन डायबेटिस' असल्यामुळे एका साडेपाच वर्षीय पाल्याला शाळेत प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. 

शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात असतानाही केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलने पाल्याला प्रवेश नाकारला आहे. सुरवातीला शाळेने प्रवेश दिला होता; परंतु काही दिवसांनी पाल्याच्या आजाराचे कारण पुढे करून शाळेने प्रवेश नाकारल्याचे संबंधित पाल्याच्या आईने "सकाळ'शी बोलताना सांगितले. सध्या शहरातील बहुतांश शाळांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या असताना, आपल्या पाल्याला कोणती शाळा प्रवेश देईल, या चिंतेत संबंधित पालक आहेत. 

केवळ पाल्याच्या आजाराचे कारण पुढे करून शाळेने प्रवेश नाकारल्याने हताश झालेल्या पालकांनी "सकाळ'शी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, """टाइप वन डायबेटिस' या आजाराने माझा पाल्य ग्रासलेला आहे. त्याला दिवसातून दोनदा इन्सुलिनचे इंजेक्‍शन द्यावे लागते. यापूर्वी माझा पाल्य संस्कृती स्कूलमध्ये शिकत होता. त्या शाळेत पाल्याची व्यवस्थित काळजी घेतली जात होती; परंतु ही शाळा घरापासून लांब असल्यामुळे इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी आम्ही कोंढव्यातील कोठारी शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला शाळेनेही होकार दिला. त्या वेळी प्रवेशादरम्यान पाल्याच्या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती शाळेला देण्यात आली होती. शाळेनेही आम्ही नीट काळजी घेऊ, असे सांगितले. त्याप्रमाणे प्रवेशप्रक्रिया झाली. त्यानंतर काही दिवसांनी शाळेने प्रवेश देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.'' 

कोठारी शाळेचे मुख्याध्यापक संदीप खन्ना यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ""संबंधित पालकांनी पाल्याच्या आजाराची कल्पना दिली, त्या वेळी आम्ही विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला. शाळेतील शिक्षक आणि वैद्यकीय सहायकांशी बोलून कळवितो, असे संबंधित पालकांना सांगितले होते. त्यांच्या पाल्याला प्रवेश देण्याची "रिस्क' घेऊ शकत नाही, असे सर्वानुमते ठरले आणि तसे त्यांना कळविण्यात आले.'' 

"टाइप वन डायबेटिस' असणाऱ्या रुग्णांसाठी शाळेत कोणत्याही विशेष सुविधा असण्याची गरज नाही. 
- "युनायटेड वर्ल्ड अगेन्स्ट डायबेटिस'चे डॉ. ललितकुमार उपाध्याय 

Web Title: School denial of admission due to diabetes