बियाणे विक्रेत्यांचे १५९ परवाने रद्द - सुनील खैरनार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

पुणे - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गेल्या वर्षभरात १५९ बी-बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले असून, अन्य १० दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. परवान्याचे नूतनीकरण न केल्याने १४६ बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तर अन्य १३ दुकानांचे परवाने हे बियाणे कायद्यानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी शुक्रवारी (ता. ७) दिली. 

रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अधिकृत परवाने (लायसन्स) दिले जातात. या नियमानुसार नूतनीकरण करणे अनिवार्य असते. मात्र १४६ दुकानांनी या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. यामध्ये ५० बियाणे, ५६ रासायनिक खत आणि ४० कीटकनाशके विक्रेत्यांचा समावेश असल्याचेही खैरनार यांनी सांगितले. 

खैरनार म्हणाले, ‘‘निलंबित करण्यात आलेल्या खते, बी-बियाणे विक्रेत्यांपैकी काही विक्रेते बियाणे आणि खतांची जादा दराने विक्री करत असल्याचे, तसेच काहीजण मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करत असल्याचे आढळून आले. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळल्याने परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.’’

खरीप हंगाम आढावा बैठक उद्या 
जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून येत्या सोमवारी (ता. १०) पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत खरिपासाठी आवश्‍यक असलेल्या बियाणे व रासायनिक खतांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Web Title: seed sailer 159 licence cancel