आत्मविश्वास आणि आत्मविकास

आत्मविश्वास आणि आत्मविकास
आत्मविश्वास आणि आत्मविकास

आत्मविश्‍वास म्हणजे स्वतःबद्दल वाटणारा विश्‍वास. ही अशी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याच जणांना वाटते, त्यात काय एवढे मोठे, आम्ही नाही का जबाबदारी पडल्यावर सगळ निभावले. आम्ही कुठे प्रशिक्षण वगैरे थोडीच घेतले! ही सगळी हल्लीच्या पिढीचं नवीन फॅड. ट्रेनिंग वगैरे!!

असे संवाद आपल्याला वरचेवर कानी पडतात आणि बर हे सगळ बोलणाऱ्यांना इतरांना प्रोत्साहन देण्याऐवजी कधी कधी इतरांचा आत्मविश्‍वास खच्ची करण्या इतका आत्मविश्‍वास कोठून येतो बरं! उदा. एखादा युवक अथवा युवती स्वतःचा व्यवसाय करण्याचा धडाडीचा प्रयत्न करत असेल, तर त्याला ही मंडळी आधीच हमखास ऐकवणार ""ते काय आपल्याला जमण्यातलं नाही. बाजारात इतकी मंदी, त्यात तू फार वेगळ काय करणार. त्यापेक्षा आपली दहा ते सहा नोकरी बरी!!
एखादा लहान मुलगा पटकन येऊन मी मदत करतो म्हणाला तर त्याला ""तू आमच्या कामात लुडबुडू नकोस. तुला काही हे जमणार नाही. त्यापेक्षा तू आपला खेळायला जा बघू!!

आता वरील संवादात आपल्याला वरवर पाहता वावगं असं काही वाटत नाही. कारण, हे घराघरामध्ये नेहमीचे येणारे संवाद आहेत; पण हीच खरी ग्यानबाची मेख आहे. कारण त्याचा आशय हा इतरामध्ये आत्मविश्‍वासाचे विचार आणि बोलणे पेलणारा नाही.
बरीच कॉलेजवयीन युवक - युवती माझ्याकडे कौन्सिलिंगला येतात तेव्हा त्यांचा मुख्य सूर हाच असतो की शिक्षण इंजिनिअरिंग किंवा व्यावसायिक स्वरूपाचे असूनही माझ्यात आत्मविश्‍वासाची कमतरता जाणवते. मग मी तो कसा वाढवू!!
तर याचे सर्वांत महत्त्वाचे उत्तर म्हणजे इतरांच्या नजरेतून स्वचे मूल्यमापन न करणे. इतरांना मी कसा वाटतो, याचा प्रमाणाबाहेर विचार करणे, इतरांची मते केवळ फिडबॅक म्हणून घेण्याऐवजी तीच गृहितके मानून चालणे, यामुळे आत्मविश्‍वास पूर्णतः नाहीसा होतो. त्याऐवजी ज्या गोष्टी आपल्याला नीटपणे जमतात त्यांचा विचार करणे व त्याचा उपयोग करून आत्मविश्‍वास वाढवून ज्या गोष्टी, स्किल्स आत्मसात करायची आहेत, तिकडे त्याचा चांगला वापर करू शकतो व हळूहळू स्वतःच्या क्षमता अधिकाधिक विकसित करू शकतो.

या प्रक्रियेमध्ये स्वतःच्या कमतरतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास फाजील बढाईखोर आत्मविश्‍वास निर्माण होईल त्याचा वास्तवाशी फारसा संबंध नसेल; पण इतरांचे फिडबॅक लक्षात घेऊन आपल्या कमतरता व बलस्थाने लक्षात घेऊन बलस्थानांकडे जास्त लक्ष देत गेल्यास आत्मविश्‍वास जाणीवपूर्वक वाढवता येतो.

आपल्या कृती, प्रेरणा, क्षमतांची आपल्याला माहिती असणे व त्यात योग्य ते बदल करत करत आपल्याला नवीन सेल्फ ईमेज व आत्मविश्‍वास टप्प्या टप्प्याने वाढविता येऊ शकतो. हे सगळं झालं स्वतःचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी. पण इतरांच्या बाबतीत किमान इतरांना प्रोत्साहनपर बोलता येत असेल, आपल्या कृतिमुळे इतरांना सकारात्मक ऊर्जा व एनकरेजमेंट मिळत असेल तर ते जरूर बोलावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास दृढ होण्यास नक्कीच मदत होईल; पण आपली स्वतःची नकारात्मकता, शंका व्यक्त करून इतरांचा आत्मविश्‍वास अजाणतेपणी आपल्यामुळे खच्ची होणार नाही, याची काळजी घ्यावी.

लहान मुलांचा आत्मविश्‍वास वाढवताना, त्यांना काही प्रयत्नात गोष्टी नाही जमल्या तरी, तुला हे नक्की जमेल, पुन्हा जरा वेगळ्या प्रकारे प्रयत्न करून बघ पाहू. या प्रकारचे बोलणे व संवाद तसेच चांगले केल्यानंतर न विसरता शाबासकीची थाप कौतुकाचे शब्द यामुळे त्याचे स्वतःवरील विश्‍वास अधिकाधिक दृढ होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com