नयना पुजारी बलात्कार-खून प्रकरणी तिघांना फाशी

महेंद्र बडदे
मंगळवार, 9 मे 2017

नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणी  तिन्ही आरोपींवर भारतीय दंड विधानातील अपहरण (कलम 366), सामूहिक बलात्कार (कलम 376 जी), खून (कलम 302), मयत व्यक्तीच्या वस्तूंचा अपहार करणे (कलम 404), कट रचणे (कलम 120 ब) आणि पुरावा नष्ट करणे (201) आदी कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते.

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी  फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सोमवारी (ता. 8 एप्रिल) या तिघांना दोषी ठरविले होते. 

या खटल्यातील आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर आज (मंगळवारी) मिळाले. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराला दोषमुक्त ठरविले गेले. खटल्यातील मुख्य आरोपी योगेश अशोक राऊत (वय 24, रा. गोळेगाव, खेड) याने माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा देण्याची मागणी युक्तीवादावेळी केली. या खटल्यातील अन्य आरोपी महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी. रा. दिघी, मूळ रा. सातारा) यांनाही शिक्षा सुनाविण्यात आली.

या तिन्ही आरोपींवर भारतीय दंड विधानातील अपहरण (कलम 366), सामूहिक बलात्कार (कलम 376 जी), खून (कलम 302), मयत व्यक्तीच्या वस्तूंचा अपहार करणे (कलम 404), कट रचणे (कलम 120 ब) आणि पुरावा नष्ट करणे (201) आदी कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी पुरावा नष्ट करण्याचे कलम वगळता इतर कलमांखाली न्यायालयाने त्यांना सोमवारी दोषी ठरविले होते. 

माफीच्या साक्षिदारालाही शिक्षा द्या: आरोपीची मागणी

आज शिक्षेच्या सुनावणीवेळी मुख्य आरोपी योगेश राऊत म्हणाला, की माफीचा साक्षीदारही तितकाच दोषी आहे. आम्हाला शिक्षा दिली तर त्यालाही शिक्षा देण्यात यावी. माझा गुन्ह्याशी संबध नाही. जो माफीचा साक्षीदार झाला आहे त्या राजेश चौधरीने माझी गाडी नेली होती. माझ्या घरी बायको, मुलगी आहे त्यांना सांभाळायला कोणी नाही. या सगळ्याचा विचार व्हावा.

या खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची साक्ष नोंदविली आहे. आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा करताना निंबाळकर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे निकालाचे दाखले दिले. बच्चीसिंग, वसंत तुपारे, पुरुषोत्तम बोराटे, उत्तर प्रदेश राज्य सरकार विरुद्ध सतिश खटला, मुंबई उच्च न्यायालयातील शंकर खाडे खटला आदीचा दाखला त्यांनी दिला. गुन्ह्याची हकीकत सांगून निंबाळकर यांनी हा गुन्हा किती अमानवी असल्याचा दावा केला. असहाय असलेल्या पुजारी आरोपींकडे याचना करीत होत्या, सोडून देण्याची मागणी करीत होत्या. परंतु आरोपीना दया आली नाही. त्यांनी राक्षसी कृत्य सुरुच ठेवले. या घटनेमुळे काम करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हा गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्यांनी तिचा खून केला. आयटी क्षेत्रात महिला रात्रपाळीत काम करतात, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला, केवळ पुजारीच नाहीतर काम करणाऱ्या प्रत्येक महिलांच्या कुटुंबियांमध्ये भीती निर्माण करणारा हा गुन्हा आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असतानाच,  त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनातील वाढ कायदे तयार करणाऱ्यासमोर चिंता आहे. हा गुन्हा निर्भया आणि ज्योतीकुमारी प्रकरणापेक्षा गंभीर असल्याने आरोपींना फाशीच द्यावी.

खटल्याच्या सुनावणीस विलंब 
ऑक्‍टोबर 2009 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आणि त्यांच्याविरुद्ध मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना यश आले होते; परंतु खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी राऊत हा ससून रुग्णालयातून पळाला होता. तो सुमारे पावणेदोन वर्षानंतर पोलिसांना सापडला. यामुळे खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला. राऊत पळून जाण्यापूर्वी सहा जणांची साक्ष झाली होती. तो परत सापडल्यानंतर त्यापैकी काही साक्षीदारांची फेरसाक्ष नोंदवावी लागली. याच काळात सुरवातीला माफीचा साक्षीदार झालेला चौधरी याने त्याला माफीचा साक्षीदार करू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. राऊत सापडल्यानंतर तो पुन्हा माफीचा साक्षीदार झाला होता. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश मदन जोशी, त्यानंतर अनंत बदर, साधना शिंदे या न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. प्रत्येक न्यायाधीशांसमोर खटल्याचे कामकाज चालले; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर खटल्याची सुनावणी पुढील न्यायाधीशांसमोर झाली. विशेष न्यायाधीश येनकर यांच्यासमोर नियमित सुनावणी होऊन अंतिम सुनावणी पार पडली. 

पसार राऊतचा शोध घेणे आव्हानच 
हा गुन्हा घडल्यानंतर पुण्यातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी आंदोलने केली, तसेच मूक मोर्चा काढला होता. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी राऊत हा खटल्याची सुनावणी सुरू असताना ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्याचा शोध घेताना पोलिसांना नाकीनऊ आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकही स्थापन केले होते. त्याचवेळी पोलिसांची विविध पथके या संदर्भात काम करीत होती. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिसही त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याचे नातेवाईक, मित्र आदींवर पाळत ठेवली आणि त्यांची माहिती घेतली होती. त्यानुसार तपास आणि त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. आरोपी राऊत हा गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथे राहिला होता. दिल्ली येथे तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस तेथे गेले. तेथे तो नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली; तसेच तो शिर्डी येथे दर्शनाला गेल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली होती. दरोडाप्रतिबंधक पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी आरोपी राऊतला शिर्डी येथे अटक केली होती. तो भावाच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात पुढे आली होती.

गुन्ह्याच्या तपासात पोलिसांचे यश 
हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध एका आठवड्याच्या आत लावण्यात यश मिळविले होते. आरोपी राऊत हा झेन्सार या कंपनीत भाडेतत्त्वावरील वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या मालकीची काही चार चाकी वाहनेही होती, तर माफीचा साक्षीदार चौधरी हा पुजारी काम करीत असलेल्या "सिनेक्रॉन' या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. कदम हा वाहनचालक म्हणून काम करीत असे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना कंपनीतील कर्मचाऱ्यांबाबतची माहिती पडताळून पाहिली होती. घटनेनंतर राऊत हा 11 ऑक्‍टोबरपासून कामावर आला नव्हता, तसेच कदमही कामावर हजर नसल्याचे त्यांना आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी राऊतला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा उघड झाला होता. आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविल्याने पोलिस निरीक्षक सुनील पवार, तपास अधिकारी दीपक सावंत, विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक एस. ए. सय्यद, पोलिस कर्मचारी प्रकाश लंघे, सचिन कदम, सुनील कुलकर्णी, अस्लम अत्तार आदींच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

घटनाक्रम 

 • 7 ऑक्‍टोबर 2009 - नयना पुजारी यांचे अपहरण, बलात्कार, खून 
 • 8 ऑक्‍टोबर 2009 - राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे पुजारी यांचा मृतदेह आढळला, खेड पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद 
 • मृतदेहाची ओळख पटल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग 
 • 16 ऑक्‍टोबर 2009 - तीन आरोपींना अटक 
 • जानेवारी 2010 - चार आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल 
 • जुलै 2010 - माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याचा "इन कॅमेरा' जबाब नोंदविला गेला 
 • नोव्हेंबर 2010 - राजेश चौधरी याचा जबाब न्यायालयात उघड 
 • फेब्रुवारी 2011 - तीन आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित 
 • 17 सप्टेंबर 2011 - ससून रुग्णालयातून आरोपी राऊत पळाला 
 • 31 मे 2013 - शिर्डी येथे आरोपी राऊत याला अटक 
 • 8 मे 2017 - तिन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले
 • 9 मे 2017 - आरोपींना फाशीची शिक्षा