शरद पवार यांचीच नियत खोटी - पाशा पटेल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांचीच नियत खोटी आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

पवार यांनी संपाबद्दल शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे वक्‍तव्य केले होते. त्या अनुषंगाने पटेल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली. सध्याच्या सरकारची नियत कशी आहे, याचे मोजमाप करण्यापूर्वी पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता भोगली तरी शेतकऱ्यांची अवस्था अशी का झाली, याचे आधी उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी २०१३ या एकाच वर्षात किमान तीन हजार १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २००४ ते २०१३ या कालावधीत राज्यात दरवर्षी तीन हजार ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.’’

केंद्र आणि राज्य सरकार यांची नियत साफ आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. असे त्यानी सांगितले.

जनतेमधील पाठिंबा संपुष्टात आल्यामुळे आता पवार शेतकऱ्यांना भडकावून पुन्हा राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचा आंदोलनात बळी द्यायचा आणि तापलेल्या वातावरणात स्वतःचे राजकारण साधायचे, हा त्यांचा डाव घातक आहे.
-  पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

Web Title: sharad pawar pasha patel politics