शिवसेनेचे शंभर उमेदवार निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - पुणे शहरातील शंभर जागांची यादी शिवसेनेकडून निश्‍चित करण्यात आली असून, ही यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी सुपूर्त करण्यात आली. येत्या मंगळवारपर्यंत पक्षाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ज्या जागांवर एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत आणि एकमत झालेले नाही, अशा जागांबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात येणार आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांचे भाचे संतोष भरणे, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब मालुसरे आणि माजी नगरसेवक कै. आबा निकम यांचे चिरंजीव हरीश निकम यांनी सोमवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश झाला. भाजपबरोबरच युती न करण्याचा निर्णय झाल्यानंतर शहर शिवसेनेकडून स्वबळाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत पक्षाकडून प्रभागनिहाय आढावा घेऊन उमेदवारांची प्रारूप यादी तयार करण्यात आली होती. आज दुपारी ही यादी पक्षाच्या नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केली. 

प्रभाग क्र. 12 प्रलंबित 
मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी (क्रमांक 12) या प्रभागात नगरसेविका संगीता देशपांडे, पृथ्वीराज सुतार आणि योगेश मोकाटे असे तीन विद्यमान नगरसेवक एकत्र आले आहेत. यांच्याशिवाय माजी नगरसेवक श्‍याम देशपांडे यांच्यासह अनेक जण येथून इच्छुक असल्याने यापैकी कोणाला उमेदवारी  मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातील एक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पक्षाकडून हा प्रभाग प्रलंबित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पक्षश्रेष्ठी आणि संपर्कप्रमुख याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.