राष्ट्रवादीला चितपट करण्यासाठी युतीचा निर्णय

अविनाश चिलेकर
बुधवार, 11 जानेवारी 2017

भाजप-सेना नेत्यांच्या बैठकीत निर्धार; आजपासून समन्वय समितीत जागानिहाय चर्चा

भाजप-सेना नेत्यांच्या बैठकीत निर्धार; आजपासून समन्वय समितीत जागानिहाय चर्चा
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत युती करायचीच, असा ठाम निर्धार भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. 128 जागांपैकी कोणाला किती, यापेक्षा पक्षाची ताकद आणि उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहूनच सर्व जागांचे वाटप करायचे, असेही या वेळी ठरले. (ता. 11) बुधवारपासून (ता. 11) समन्वय समितीमध्ये जागानिहाय चर्चा होणार असून, आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजले.

युतीची प्राथमिक बोलणी करण्यासाठी सोमवारी रात्री विशेष बैठक झाली. त्याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली. त्या वेळी शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे, ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, भाजपकडून खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे प्रमुख उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे अनुपस्थित होते.

स्वबळावर लढायचे की, युती कराची यावर बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत युती करूनच लढायचे, असाही निर्णय झाला. 50-50 टक्के जागेचा फॉर्म्युला किंवा लोकसभा आणि विधानसभेला कोणाला किती मते मिळाली, याहीपेक्षा सद्यःस्थितीत कोणाची कुठे किती ताकद आहे, ते पाहून जागांचे वाटप करायचे, असेही ठरले. बारणे आणि जगताप यांनी दोन्ही बाजूंचे गुंतागुंतीचे प्रश्‍न स्वतःहून निकालात काढले. चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या एका नेत्याने "सकाळ'ला सांगितले.

2012च्या सार्वत्रिक निवडणुकीत 128 पैकी तब्बल 82 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. त्याशिवाय 11 अपक्षांनी सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला होता. त्याशिवाय कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 14, मनसे चार आणि भाजप तीन, असे संख्याबळ होते. गेल्या लोकसभेला युती झाल्यामुळे दोन्ही शिवसेनेचे खासदार (मावळ आणि शिरूर) विजयी झाले. त्यानंतर युती नसताना दोन्ही पक्षांना एक एक आमदारकीची जागा (चिंचवड आणि पिंपरी) मिळाली. राष्ट्रवादीची मते घटत गेली आणि दुसरीकडे युतीची मते वाढतच गेली. राजकीय घडामोडींत अपक्ष आमदार महेश लांडगे आपल्या नऊ समर्थक नगरसेवकांसह भाजपला मिळाले. त्यांच्यापाठोपाठ आता माजी महापौर आझम पानसरे भाजपमध्ये आले. त्यामुळे भाजपची ताकद अनेक पटींनी वाढली आणि राष्ट्रवादीचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत सत्तेत येण्यासाठी म्हणून युती करूनच लढायचे, असे भाजपने जाहीर केले आहे.

जागावाटपात एका प्रभागात चार जागा असल्याने प्रत्येकी दोन-दोन उमेदवार, असा फॉर्म्युला मांडण्यात आला होता. गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते कुणाला आहेत त्यानुसार वाटप करायचे, असाही प्रस्ताव होता. त्यातून वाद निर्माण होईल आणि बोलणी फिसकटतील म्हणून हा निकष बाजूला ठेवण्यात आला. जिथे शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र आहे तिथे प्रसंगी तीन जागा शिवसेनेला आणि एक भाजपला, असे करायचे ठरले. खासदार बारणे आणि जगताप यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रातही अडून न राहता वास्तव चित्र असेल त्यानुसार जागांची मागणी करायची, यावर सहमती दर्शविली. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असूनही त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने युतीची बोलणी पुढे सरकली. आमदार लांडगे आणि माजी महापौर पानसरे यांनाही त्यांच्या समर्थकांची ताकद पाहूनच जागा द्यायच्या, अशी चर्चा झाली.

भाजपच्या सर्वेक्षणात युतीचा निष्कर्ष
भाजपने आजवर तीन वेळा तीन स्वतंत्र संस्थांकडून सर्वेक्षण करून घेतले. त्यात युती केली तरच सत्ता येणे सहज शक्‍य आहे, असा निष्कर्ष आला. स्वबळावर भाजपला पहिल्या पसंतीमध्ये 50 ते 55 च्या आसपास जागा असल्याचे चित्र समोर आले. दुसरीकडे शिवसेनेच्या जागा 20 ते 25 पर्यंत सीमित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळेच दोन्ही पक्षांची युतीसाठी आग्रही भूमिका असल्याचे समजले.