‘आत्मक्‍लेश’मध्ये शिवसेनेचा सहभाग

‘आत्मक्‍लेश’मध्ये शिवसेनेचा सहभाग

पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे.

शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आत्मक्‍लेश यात्रेला निरोप देण्यासाठी मंगळवारी सकाळी सात वाजता आकुर्डीला उपस्थित होते. तसेच, शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक राहुल कलाटे, मारुती भापकर, सुलभा उबाळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी सोमवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात यात्रेच्या स्वागताला उपस्थित होते. भगवी उपरणे घातलेले शिवसैनिक आणि ‘सात बारा कोरा करा’ अशी मागणी लिहिलेली पांढऱ्या रंगाची गांधी टोपी परिधान केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई-पुणे रस्त्यावरून पिंपरीकडून आकुर्डीकडे मार्गस्थ होऊ लागले, तेव्हाच दोन्ही संघटनांतील वेगळ्या समीकरणाची नांदी सुरू झाल्याचे दिसून आले.   

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवडमध्ये या संघटनेचे अस्तित्व कमी असले, तरी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लढा देणाऱ्या या संघटनेचे हितचिंतक मोठ्या संख्येने आहेत. देशात सर्वत्रच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलने जोर धरत असताना, महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावरून आंदोलने सुरू झाली आहेत. योग्य वेळी कर्जमुक्ती करू, असे सांगत भाजपचे सरकारही ती मागणी वेगळ्या पद्धतीने मान्य करणार असल्याचे सुचवीत आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांनी कर्जमुक्तीच्या मुद्‌द्‌याला प्राधान्य दिले आहे.

‘स्वाभिमानी’ संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये फूट पडल्याचे उघडपणे दिसू लागले आहे. तर भाजप आणि शिवसेना या शहरी तोंडावळा असलेल्या राजकीय पक्षांना एका सक्षम शेतकरी नेत्यांची गरज आहे. ही राजकीय अपरिहार्यता महायुतीतील घटक पक्षांची फेरमांडणी करण्यासाठी भाग पाडत आहे. ‘स्वाभिमानी’चे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे, तर शेट्टी यांनी सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

‘स्वाभिमानी’च्या यात्रेत शिवसेनेच्या नेत्यांच्या सहभागाविषयी शिवसेनेचे शहराध्यक्ष कलाटे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत शिवसेनेनेही भूमिका घेतली असून, दोन्ही पक्षांचे त्या बाबत एकमत आहे. नाशिक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी शिवसेनेच्या व्यासपीठावर एकत्र आले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर ‘आत्मक्‍लेश’ करून घेण्यासाठी आम्ही शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी पिंपरी-चिंचवड भागात शेट्टी यांच्या यात्रेत सहभागी झालो. यात्रेला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तसे निरोप सर्वांना दिले होते.’’

भापकर म्हणाले, ‘‘समृद्धी एक्‍स्प्रेस-वे’ला विरोध करण्यासाठी शेतकरी एकत्र येत आहेत. त्या मुद्‌द्‌यावर ठाकरे आणि शेट्टी यांच्यात एकमत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षाची युती झाली असून, ते भाजपविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे, शिवसेना आणि ‘स्वाभिमानी’ एकमेकांच्या अधिक जवळ येत असल्याचे जाणवू लागले आहे.’’

राजू शेट्टी यांना ‘कष्टकरी’चा पाठिंबा 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश पदयात्रेस कष्टकरी संघर्ष महासंघाने पाठिंबा देऊन सहभाग घेतला. अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, खासदार श्रीरंग बारणे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, माजी नगरसेवक मारुती भापकर, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अमरसिंह कदम, उमेश डोर्ले, साईनाथ खंडीझोड, इरफान चौधरी, अनिल बारवकर, के. के. कांबळे उपस्थित होते. आकुर्डी येथे मुक्काम करून सकाळी पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली. भक्ती-शक्ती चौकात संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना खासदार शेट्टी, बारणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com