शिवसृष्टीत साकारतेय 65 हजार चौरस फुटांची राजसभा 

शिवसृष्टीत साकारतेय 65 हजार चौरस फुटांची राजसभा 

पुणे  - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसभेत बसण्याचा अनुभव यावा, या उद्देशानेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नऱ्हे-आंबेगाव येथील शिवसृष्टीत 65 हजार चौरस फुटांमध्ये राजगडावरील राजसभा साकारण्यात येत आहे. प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे कामही 75 टक्के पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यांत महाराजांची दुर्ग सफर, पावनखिंडीतली लढाई, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक यांसह शिवचरित्रातील प्रमुख नऊ प्रसंग व्हर्चुअलच्या माध्यमातून दाखविण्यात येणार असून,जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) अंतर्गत शिवसृष्टीला पाच कोटी रुपये अर्थसाहाय्य जाहीर झाले आहे. 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.12) दुपारी तीन वाजता आयोजित कार्यक्रमात शिवसृष्टीला पाच कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी 1967 मध्ये महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठान अंतर्गत नऱ्हे-आंबेगाव येथे 21 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. 2007 च्या दसऱ्यापासून तेथे प्रत्यक्षात बांधकामास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात 36 हजार चौरस फुटांमध्ये सरकारवाडा, दुर्ग प्रदर्शनी, ग्रंथालय व वातानुकूलित प्रेक्षागृह उभारण्यात आले आहे. आत्तापर्यंत 40-42 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, दानशूरांनी दिलेल्या अर्थसाहाय्यावर शिवसृष्टीचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या विश्‍वस्तपदाची जबाबदारी बाबासाहेब पुरंदरे, अरविंद खळदकर, श्रीनिवास विरकर, सुनील मुतालिक, अण्णासाहेब कंग्राळकर, अमृत पुरंदरे, जगदीश कदम सांभाळत आहेत. 

कदम म्हणाले, ""एकूण तीनशे दोन कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगातून व दानशूरांनी दिलेल्या देणगीतून आत्तापर्यंतचे काम झाले. देशातील अन्य राज्य सरकारांनी अर्थसाहाय्य केल्यास शिवसृष्टीचे काम वेगाने होऊ शकेल. पहिल्या टप्प्यातल्या कामाचे तीन-चार महिन्यांत लोकार्पण होईल. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. सतराव्या शतकातली अनुभूती पाहणाऱ्यांना यावी, अशा पद्धतीचे जुन्या धाटणीचे बांधकाम करण्यात येत आहे. राजसभेचे चाळीस टक्के काम झाले आहे. तेथे अश्‍वारोहण केंद्र, सतराव्या शतकातील गावगाड्याचे प्रारूप, प्रतापगडावरची राजमाची, उखळी तोफ, दुमजली वाडा यांसारखी कामेही करण्याचे पुढच्या टप्प्यांत नियोजित आहे. '' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com