महापालिकेकडूनच पदपथावर दुकाने बांधण्याचे काम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

पुणे - बिबवेवाडीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावरील पत्र्याच्या स्टॉलच्या ऐवजी महापालिकेने चक्क पदपथावर दुकाने बांधण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कामाला पालिकेच्याच भवनरचना या दुसऱ्या विभागाने स्थगिती दिली असली, तरी प्रत्यक्षात काम बंद झालेले नाही. पदपथावर महापालिकाच दुकाने कशी बांधू शकते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

बिबवेवाडी गावठाणाशेजारी मुख्य रस्त्यावरील पत्र्याचे स्टॉल काढून त्या ठिकाणी पक्‍क्‍या बांधकामातील स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे. स्थायी समितीच्या मुख्य सभेमध्ये ठरावाद्वारे विवेकानंद मार्गावरील पत्र्याचे स्टॉल काढून त्या ठिकाणी स्टॉल बांधून देण्यासाठी भवन विभागाने १७ लाख रुपयांची निविदा काढली व बांधकाम सुरू केले; परंतु विवेकानंद मार्ग ‘नो हॉर्कस झोन’ असल्यामुळे येथे पालिकेने कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भवन विभागाने पुन्हा बांधकाम थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. बांधकामासाठी अतिक्रमण, रस्ता व भवन विभागाच्या अभिप्रायानुसार बांधकाम सुरू करून एकूण ६१ स्टॉल बांधण्यात येणार होते.

त्यापैकी १८ पत्र्याचे स्टॉल काढून त्या ठिकाणी २२ स्टॉल बांधलेले आहेत. बांधलेल्या स्टॉलमध्ये येथीलच स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणार असल्याचे प्रशासन सांगते; परंतु बांधकामात वाढलेल्या स्टॉलचे काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुनर्वसन कधी? 
महापालिका प्रशासन ‘नो हॉकर्स झोन’मध्ये स्टॉल बांधत असल्यामुळे शहरातील ४५ रस्ते व १४७ चौक ‘नो हॉकर्स झोन’मध्ये आहेत, त्या ठिकाणी स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणार का, असे इतर ठिकाणांवरील स्टॉलधारक विचारत आहेत.