लघू चित्रपट महोत्सवात "श्रद्धा' ठरला विजेता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पिंपरी - स्पार्क फिल्म फाउंडेशनमार्फत संत तुकारामनगरमध्ये आयोजित तिसऱ्या लघू चित्रपट महोत्सवात अंधश्रद्धानिर्मूलनावर आधारित आणि एफपीएनिर्मित "श्रद्धा' लघू चित्रपट विजेता ठरला. डॉ. नितीन महाजन यांच्या "मच्छर' लघू चित्रपटाला द्वितीय; तर चैतन्य काबे यांच्या "एक फोन कॉल'ला तृतीय क्रमांक मिळाला.

महोत्सवाचे उद्‌घाटन लेखक-दिग्दर्शक राहुल भंडारे यांच्या हस्ते झाले. दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, अभिषेक बारणे उपस्थित होते. विजेत्या लघू चित्रपटांना "हळद रुसली...कुंकू हसलं' या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश दरक, चित्रपट निर्माते शंकर तंवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सचिन साठे, गुरुदास भोंडवे, चिराग फुलसुंदर उपस्थित होते.

भंडारे म्हणाले, ""चित्रपट या माध्यमामधून छोटीशी गोष्टसुद्धा चांगल्या पद्धतीने खूप लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवता येते. चित्रपटनिर्मितीची आवड असल्याशिवाय उत्कृष्ट चित्रपट तयार होत नाही.'' उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नीलेश ओहाळ (72 मिनिटे), उकृष्ट छायाचित्रण चैतन्य काबे (अपाइंमेंट) यांना तर परीक्षकांची निवड म्हणून "सेलिब्रेशन' या लघू चित्रपटाला गौरविण्यात आले. महोत्सवात बारा लघू चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
सतीश अडसूळ, शार्दूल लिहिणे, मयूर जोशी, संदीप पंडित परीक्षक म्हणून काम पाहिले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक तेजस चव्हाण यांनी केले. गुरुदास भोंडवे यांनी आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विनय पुजारी, शिवानंद स्वामी, दत्ता गुंजाळ, अभिषेक काटे, बन्सी वाघमारे यांनी प्रयत्न केले.