त्वचासंसर्गाचे निदान काही मिनिटांत!

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

रुग्णालयांमध्ये, तसेच अस्वच्छ ठिकाणी होणाऱ्या त्वचासंसर्गामुळे डॉक्‍टरांकडून भरमसाट प्रतिजैवकांचा वापर केला जातो. त्याचा दुष्परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो. प्रतिजैवकांचा हा अतिवापर टाळायचा असल्यास त्वचा संसर्गाचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. हे निदान काही मिनिटांमध्ये करणारे ‘पोर्टेबल डर्मास्कोप’ हे उपकरण ‘ॲडिवो डायग्नोस्टिक्‍स’ या स्टार्टअपने विकसित केले आहे. 

गीतांजली राधाकृष्णन यांनी षण्मुघ आर्टस, सायन्स, टेक्‍नॉलॉजी अँड रिसर्च ॲकॅडमी येथून ‘बायोमेडिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण २०११मध्ये पूर्ण केल्यानंतर बंगळूरमध्ये ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ आणि ‘राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी’मध्ये ‘रिसर्च इंटर्न’ म्हणून काम केले. त्यानंतर ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मध्ये तब्बल चार वर्षे, म्हणजे ऑक्‍टोबर २०१५पर्यंत त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली. बायोमेडिकल आणि सॉफ्टवेअरमधील अनुभवाचा वापर काहीतरी चांगले आणि समाजाला उपयुक्त ठरेल असे करण्यासाठी व्हावा, हा विचार त्यांच्या मनात आला. त्या वेळी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचे गीतांजली यांनी ठरविले. डॉ. आयुष गुप्ता यांच्याशी चर्चा करताना त्वचासंसर्गाच्या विषयाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्वचासंसर्गाचे निदान लवकर झाल्यास त्यातून समाजाला, विशेषतः ग्रामीण भागातील व गरीब रुग्णांना खूप फायदा होईल व त्यासाठी स्वस्तातील वैद्यकीय उपकरण विकसित करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. त्यातून जन्म झाला ‘ॲडिवो डायग्नोस्टिक्‍स’ या स्टार्टअपचा. नवउद्योजक होण्याच्या इच्छाशक्तीवर ‘विलग्रो’ या सोशल एन्टरप्राईज इनक्‍युबेटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अनकन्व्हेन्शल चेन्नई’ या कार्यक्रमात गीतांजली सहभागी झाल्या आणि त्यांची अंतिम फेरीत निवड झाली. त्यापाठोपाठ त्यांची ‘एएसएमई इनोव्हेशन शोकेस २०१६’ या स्पर्धेतही निवड झाली. 
देशामध्ये फक्त सहा हजार त्वचारोगतज्ज्ञ असल्यामुळे बहुतांश नागरिकांना झालेल्या त्वचासंसर्गावर जनरल फिजिशियनच उपचार करतात. परंतु, हा त्वचासंसर्ग नेमका कशामुळे झाला आहे, याचे निदान लवकर आणि अचूक न झाल्यामुळे बऱ्याचशा डॉक्‍टरांकडून प्रतिजैवकांचा मारा केला जातो. त्यातून भविष्यकाळात ‘ड्रग रेसिस्टन्स’, सुपरबग्ज व अन्य समस्या उद्‌भवतात. ते टाळण्यासाठी त्वचासंसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘पॅथोजन्स’चा शोध घेणे व त्याचे स्वरूप लक्षात घेऊन ठराविकच औषधे रुग्णाला द्यावी लागतील. असे अचूक निदान करणारे ‘पोर्टेबल डर्मास्कोप’ हे उपकरण गीतांजली यांनी विकसित केले. 
‘पोर्टेबल डर्मास्कोप’ उपकरण विकसित करण्याचे काम चेन्नईमध्ये सुरू आहे, तर मायक्रोबायोलॉजिकल संशोधनानिमित्त राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ‘व्हेन्चर सेंटर’मध्ये गीतांजली दर महिन्याला भेट देतात. ‘बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल’ आणि ‘विलग्रो’कडून मिळाळेल्या निधीच्या आधारावर ‘ॲडिवो’चे काम सुरू आहे. 
गीतांजली म्हणाल्या, ‘‘पोर्टेबल डर्मास्कोपमध्ये एक कॅमेरा बसविण्यात आला असून, त्या आधारे रुग्णाच्या शरीराच्या ठराविक भागाच्या प्रतिमा घेतल्या जातात. ‘इमेज प्रोसेसिंग अल्गोरिदम’चा वापर करून आणि कलर कोडिंगच्या आधारे त्या प्रतिमांचे विश्‍लेषण केले जाते आणि डॉक्‍टरांना अहवाल दिला जातो. पॅथोजन हे ‘ग्रॅम पॉझिटिव्ह’ असल्यास फर्स्ट जनरेशन प्रतिजैविके देता येतात व ‘ग्रॅम निगेटिव्ह’ असल्यास नवी प्रतिजैविके दिली जाऊ शकतात. अचूक निदानामुळे उपचारपद्धती निश्‍चित करता येते. या संपूर्ण प्रक्रियेच्या ‘क्‍लिनिकल व्हॅलिडेशन’ला २० नोव्हेंबर रोजी सुरवात होणार आहे.’’