निधीत सुदैवी; अंमलबजावणीत गती धिमी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतील पुणे आणि सोलापूर "स्मार्ट'पासून दूरच

स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतील पुणे आणि सोलापूर "स्मार्ट'पासून दूरच
पुणे - स्मार्ट स्ट्रीट, ई-बस, मोफत वाय-फाय, स्टार्ट अप हब, एलईडीयुक्त जाहिरात फलक, पथदिव्यांसाठी नियंत्रण कक्ष इत्यादी विविध प्रकारच्या पुण्यात 17, तर सोलापूरमध्ये 14 योजनांची कामे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू आहेत; मात्र बहुतांशी योजनांची वाटचाल धिमी असून, निधीबाबतीत पहिल्या यादीत निवड झालेली दोन्हीही शहरे सुदैवी ठरली आहेत. तंत्रज्ञानामार्फत काही योजनांची अंमलबजावणी सुरू असली, तरी पायाभूत सुविधांवर अधिक भर दिल्यास दोन्ही शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गेल्या वर्षी जानेवारीमध्ये देशातील स्मार्ट सिटीच्या पहिल्या 20 शहरांच्या यादीत पुणे आणि सोलापूरची निवड झाली. त्यानंतर पाच महिन्यांनी नागपूर, नाशिक, ठाणे आणि औरंगाबादची निवड झाली. देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्‌घाटनाचा राष्ट्रीय कार्यक्रम 25 जून 2016 रोजी पुण्यात झाला. तत्पूर्वी दोन्ही शहरांत स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करण्यासाठीची कंपनीही स्थापन झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा या कंपनीत समावेश झाला; मात्र त्यानंतर चार महिन्यांतच पुण्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आणि स्मार्ट सिटीच्या योजनांच्या कार्यवाहीचा वेग मंदावला.

प्रशासनाने 51 प्रकल्पांना चालना देण्याचा मानस आखला होता. त्यातील 14 प्रकल्पांचे उद्‌घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन प्रशासकीय कार्यप्रणाली सुलभ करण्यावर या प्रकल्पांचा भर होता. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना "अमृत' योजनेतून चालना देण्याचे नियोजन होते. तथापि, त्यात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही.

स्मार्ट सिटीची कंपनी स्थापन झाल्यापासून पुणे महापालिकेला केंद्र सरकारकडून प्रकल्पांसाठी 192 कोटी, तर राज्य सरकारकडून 93 कोटी रुपये मिळाले. महापालिकेने 100 कोटी रुपयांचा स्वहिस्सा जमा केला. सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कंपनीलाही आतापर्यंत 283 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत 2932 कोटी रुपयांचा आणि पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी पाच वर्षांसाठी 31 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय. सोलापूर महापालिकेने 2247 कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे.

पुण्यात येरवडा आणि औंधमध्ये लाइट हाऊस, 60 उद्यानांत मोफत वाय-फाय, पथदिव्यांसाठी स्वयंचलित नियंत्रण कक्ष, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प, मोकळ्या जागांचा नागरिकांना वापर करण्यासाठी चार ठिकाणी उपक्रम, स्टार्ट अप केंद्र, औंधमध्ये दीड किलोमीटरचा आदर्श रस्ता, स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र ऍप्लिकेशन, बालेवाडीत ट्रान्स्पोर्ट हब, पीएमपी प्रवाशांसाठी मी कार्ड इत्यादी उपक्रमांचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या वर्षपूर्तीपर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, तर सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा काढण्यात आली आहे. रंगभवन चौक परिसराच्या विकासासाठी 4 कोटी 77 लाख 53 हजार 520 रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय, शहरातील सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेत खुली व्यायामशाळा, ई-टॉयलेट, स्मार्ट रस्ता, अर्बन गॅलरी आणि सोलर सिटी प्रकल्पांचा समावेश आहे.

मात्र, सोलापूरमध्ये पहिल्या टप्प्यात भुईकोट किल्ल्यामध्ये लाइट अँड साऊंड शोसाठी पुरातत्त्व खात्याने आक्षेप घेतला आहे, तर होम मैदान हे देवस्थानच्या मालकीचे असल्याचे सांगत त्या ठिकाणी नाइट मार्केट भरविता येणार नाही, अशी नोटीस सिद्धेश्‍वर देवस्थान समितीने महापालिकेस बजावली आहे. रंगभवन चौकात भगवान महावीरांचा स्तंभ आहे. रुंदीकरणादरम्यान त्याला धक्का लागू नये, यासाठी हा मार्ग वळवावा, अशी मागणी जैन समाज बांधवांची आहे. त्यामुळे हे प्रकल्प राबवायचे कसे, हा प्रशासनासमोर पेच आहे.

स्मार्ट सिटी
पुणे - लोकसंख्या - 35 लाख ः स्मार्ट सिटीचा आराखडा - 2932 कोटी रुपये
सोलापूर - लोकसंख्या - 9 लाख 51 हजार - स्मार्ट सिटीचा आराखडा - 2247 कोटी रुपये
पुण्यात सुरू असलेले प्रकल्प 17; आगामी काळात कार्यान्वित होणारे प्रकल्प 7
सोलापूरमध्ये सरू असलेले प्रकल्प 14 ; आगामी काळात कार्यान्वित होणारे प्रकल्प 6
केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेला निधी ः पुणे महापालिका स्मार्ट सिटीसाठी 287 कोटी, अन्य प्रकल्पांसाठी 77 कोटी सोलापूर महापालिका 283 कोटी

Web Title: smart city work