शेतकऱ्यांसाठी स्मार्ट व्हिलेज प्रकल्प परिवर्तनकारी

smart village
smart village

प्रवीणसिंह परदेशी यांचे प्रतिपादन; स्मार्ट व्हिलेज प्रकल्पातील पारगावला भेट 

पुणे (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या कष्टाला आधुनिक ज्ञानाची जोड, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागतिक बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळणार असल्याने राज्याच्या शेतीसाठी स्मार्ट व्हिलेज प्रकल्प परिवर्तनकारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी केले. या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या पारगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रकल्पांतर्गत जुन्नर व शिरूर तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. इस्त्रायली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये सध्या कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी श्री. परदेशी स्वत: शनिवारी (ता.४) पारगावमध्ये उपस्थित झाले. त्यांच्यासमवेत डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार, फाउंडेशनच्या एडव्हायजरीचे संचालक बॉबी निंबाळकर होते. गावातील महिलांनी औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. 

अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेजमध्ये निवड झालेल्या पारगावकरांच्या अमाप उत्साहाने श्री. परदेशी भारावून गेले. ते म्हणाले की, अभिजित पवार यांनी मांडलेली स्मार्ट व्हिलेजची संकल्पना समाजावून घेण्यासाठी मी प्रत्यक्ष आज तुमच्या गावात आलो आहे. येथील शेतकऱ्यांची जिद्द, तरुणांचा उत्साह आणि त्याला या प्रकल्पामधून भविष्यात मिळणारी साथ गावाचे रूप बदलवून टाकणारी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतीचे उत्पादन वाढणार आहे. वाढलेल्या उत्पादनावर आधुनिक तंत्रातून प्रक्रिया होईल; तसेच तुमच्या शेतमालाला टेस्कोसारख्या विदेशी कंपन्या जागतिक बाजारपेठ मिळवून देणार आहेत. 

मोठी स्वप्नं बघा, मी तुमच्यासोबत : अभिजित पवार 
अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेजमधील गावांमधील शेतकरी केवळ विमानात बसू नयेत, तर गावाच्याच मालकीचे विमान असावे, असे स्वप्न आपण पाहिले पाहिजे, असे डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगताच ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधताना श्री. पवार म्हणाले की, या प्रकल्पाच्या निमित्ताने गावाची समृद्धी साधली जाणार आहे. सकाळ रिलीफ फंडातून आम्ही अनेक गावांमध्ये कामे केली. मात्र, तुम्ही आता कोणावर अवलंबून राहू नका. कोणी तरी येईल व मग आपली प्रगती होईल, या अपेक्षेतून बाहेर पडले पाहिजे. मीदेखील तुमच्यासाठी न सांगता येथे आलो आहे आणि कामालादेखील सुरवात केली आहे. त्यामुळे कोणी थट्टा केली तरी तुम्ही मोठी स्वप्नं बघा. ती साकार करण्यासाठी मी तुमच्या बरोबरीने काम करणार आहे. 

‘आम्ही शेतकऱ्यांसाठी अॅग्रोवन सुरू केला तेव्हा अशी माझीही थट्टा झाली होती. मात्र, आज शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोठा वाटा असलेल्या अॅग्रोवनच्या पुण्याईतून स्मार्ट व्हिलेजची संकल्पना तुमच्या गावात आली आहे. या प्रकल्पासाठी वेळ जाईल मात्र तुमच्या मेहनतीने विकास साधला जाणार आहे. त्यामुळे आता कसलीही अपेक्षा न ठेवता, मदतीची भीक न मागता आपण सर्व जण लढूया. तुमच्या मदतीला मी स्वत: आहे. या चळवळीतून तुमची प्रगती झाल्याशिवाय मी शांतपणे झोपणार नाही आणि तुम्हालाही झोपू देणार नाही, असा निर्धार श्री. पवार यांनी व्यक्त करताच ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून पाठिंबा व्यक्त केला. 

अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले, की उत्पादनखर्चात कपात करून उत्पादकता वाढवणे आणि शेतीमालाचे थेट मार्केटिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे हे स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे मृख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

या वेळी पारगावच्या सरपंच मीनाताई तट्टू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेजमध्ये निवड झालेल्या काळवाडीच्या सरपंच अंजली वामन, वडगाव कांदळीचे उपसरपंच संजय खेडकर, बोरीच्या सरपंच पुष्पा कोरडे, टाकळी हाजीच्या सुनीताताई गावडे; तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले. 

परदेशींनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद 
अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात निवडलेल्या गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे सखोल सर्वेक्षण सुरू आहे. त्याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी स्वत: काही शेतकऱ्यांच्या घरात गेले व त्यांच्याशी संवाद साधला. पारगावमधील युवक शेतकरी सागर भास्कर चव्हाण हा अॅटोमोबाईल इंजिनिअर असताना नोकरी सोडून अनेक समस्यांना तोंड देत थेट प्रयोगशील शेती करीत असल्याचे पाहून श्री. परदेशी चकीत झाले. 


‘आम्ही तुमच्यासारख्या शेतकरी युवकांच्या अफाट क्षमतेत देशाचे भवितव्य पाहात आहोत. तुमच्यासाठी अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज दिशादायक ठरणार आहे, असे सांगत श्री. परदेशी यांनी सागर चव्हाण यांना मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नोटाबंदी, शेतमालाचे कमी बाजार, बाजार समित्यांमधील समस्या, बॅंक कर्जवाटपातील अडथळे अशा विविध बाबींवर उपस्थित शेतकऱ्यांनी श्री. परदेशी यांच्याकडे व्यथा मांडल्या. ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आम्ही बारकाईने अभ्यास करीत असून प्रत्येक मुद्द्यावरील उपाय तपासून पाहिले जात आहेत, असेही श्री. परदेशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com