मतिमंदत्वाच्या झळा थांबवणारी 'सावली'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मतिमंद मुलांनाही भावना असतात. त्यांनाही नैसर्गिक जाणिवा असतात. मेंदूचा विकास पुरेसा न झाल्याने त्यांच्यात सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत काही मर्यादा असतात. मात्र, त्यांनाही इतरांप्रमाणेच सन्मानाने जगता यायला हवं. किंबहुना तो त्यांचा हक्कच आहे. आपण त्यांना किती अवकाश मिळू देतो, यावर त्यांचं मुख्य प्रवाहात येणं आणि उत्थापन अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही.
- वसंत ठकार

अनेकांचा आधार बनलेली संस्था पंचविशीत; समाजाच्या मदतीची अपेक्षा
पुणे - एक स्थिरस्थावर आयुष्य, चांगल्या कंपनीतली नोकरी, हाताशी बऱ्यापैकी पैसा, स्वतःचं राहतं घर असं सारं काही दिमतीला असतानाही आपली धाकटी मुलगी वैदेही हिची काळजी वसंत ठकारांना नेहमीच अस्वस्थ करायची. जन्मतः मतिमंदत्व आलेली वैदेही अधिकाधिक सक्षम आणि स्वावलंबी कशी होऊ शकेल, यासाठी ठकार नेहमीच प्रयत्नरत असत... पण केवळ वैदेहीपुरताच हा प्रश्न मर्यादित नसून, तो प्रश्न आपल्यासारख्या अनेक जणांपुढे आहे, हे त्यांना जाणवलं...आणि याच सामाजिक प्रेरणेतून पंचवीस वर्षांपूर्वी उभी राहिली "सावली' ही संस्था...

मतिमंद आणि बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी 1992 पासून अथकपणे कार्यरत असणारी "सावली' म्हणजे ठकार यांनी आपल्या घरातच लावलेलं एक छोटंसं समाजसेवेचं रोपटं. मंगळवारी सावली पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत असल्याचं औचित्य साधून "सकाळ'ने ठकार यांच्याशी संवाद साधला. या वेळी "आजवरच्या कामाबद्दल समाधानी आहेच...पण अजूनही बरंच काम बाकी आहे, या मुलांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे,' असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्नं तरळत होती.

'एकेकाळी मतिमंद मुलं म्हणजे वेडी मुलंच असल्याचा गैरसमज समाजात सरसकट असायचा. काम सुरू केलं, त्या वेळी मला अनेकदा- ठकार, या मुलांचं पुनर्वसन काय करता? त्यांना शिकवून काय होणार?... त्यांचा काही उपयोग नाही- अशाप्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळायच्या. त्या काळी या मुलांना कोणत्याही शाळा प्रवेश द्यायला तयार नसायच्या; पण वैदेहीच्या निमित्ताने मी स्वतःला पूर्णवेळ या कामात गुंतवून घेतलं आणि इतरांनाही सोबत घेत प्रवास सुरू केला,'' ठकार सांगत होते.

"नोकरीच्या निमित्ताने मी अनेकदा परदेशात जायचो. त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मतिमंद आणि बहुविकलांग नागरिकांसाठी तिकडे अनेक सोयीसुविधा केलेल्या आहेत. आपण मात्र त्याबाबतीत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मागेच आहोत. आपण आपल्याकडे मतिमंदांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं मी पक्कं केलं.' शासनाने मतिमंदांसाठी कायदा करण्याआधीच ज्यांनी आपलं काम सुरू केलं होतं त्या ठकारांची दूरदृष्टी जाणवत होती.

मतिमंद मुलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता खूप बदलला आहे, सकारात्मक झाला आहे. लोक आता त्यांना मदतही करतात. "समाज कूस बदलत आहे, शासनानेही ती बदलावी,' असं बोलकं निरीक्षणही ते शेवटी मांडतात.

परिस्थिती... तेव्हाची आणि आजची -
मतिमंद मुलांना आजच्या काळात नक्कीच चांगले दिवस येऊ शकतात. मात्र, त्यासाठी वाहून घेऊन काम करणारी माणसं आणि विश्वासार्ह संस्था गरजेच्या आहेत. आम्ही हे काम सुरू केलं, त्या वेळी पैसे नव्हते; पण माणसं होती. आता शासन आहे, पैसे आहेत पण शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचू शकत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. शासन आणि प्रशासन यांच्यातला अपुरा समन्वय आणि मतिमंद मुलांच्या पालकांपर्यंत जनजागृती पोचविणारी यंत्रणा आज कमकुवत आहे, असंही ठकार सांगतात.

ही आहेत आव्हानं
मतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर येत्या काळात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, स्वावलंबनाचा प्रश्न, मानसिक स्थैर्य, आरोग्य, नोकऱ्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृतीचा प्रश्न ही आव्हानं सुटणं महत्त्वाचं असेल, असं ठकार म्हणाले.