समाजकारणी नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

समाजकारणी नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

पुणे - एकाच आईच्या तीन मुलांना पद्म सन्मानाने गौरविण्यात आल्याचा आणि ते तीनही बंधू आमच्या परिवारातील असल्याचा आपल्याला मनापासून आनंद होतो आहे, अशी भावना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या. माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना "पद्मविभूषण' सन्मान जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांच्या इतरही अनेक निकटवर्तीयांनी "सकाळ'शी बोलताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या अनेक गौरवास्पद मुद्यांचा उल्लेख केला.

पाटील म्हणाले, ""अप्पासाहेब म्हणजेच दिनकरराव पवार; तसेच प्रतापराव आणि शरदराव ही एकाच आईची मुले. त्यांच्यापैकी अप्पासाहेबांना प्रथम आणि नंतर प्रतापराव पवार यांना "पद्मश्री' प्रदान करण्यात आली. आता देशपातळीवर काम करणाऱ्या शरदरावांना "पद्मविभूषण' जाहीर झाला आहे. हे तिघेही काटेवाडीच्या ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील. भरपूर परिश्रम, अभ्यास आणि मदत करण्याची पक्षापलीकडची वृत्ती हे शरदरावांचे वैशिष्ट्य. जातिधर्म आणि पक्षापलीकडे जाणारे ते नेते आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. महिलांना सैन्यात भरती करण्याचा निर्णय त्यांचा आहे. फळबागांना प्रोत्साहन देणे, उसाच्या संशोधनाचे काम वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये करणे; तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करणे, शेती-सहकार-लोककला या क्षेत्रांत समर्थ कामगिरी बजावणे, क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे प्रमुखपद भूषविणे ही त्यांची कामगिरी गौरवास्पद अशीच आहे. कृषिमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम होती.''

"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितले की, ""शरदराव मुख्यमंत्री झाले तेव्हा आमच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला होता. ते आज हयात असते तर त्यांना तसाच आनंद झाला असता. त्यांच्या तीन मुलांना पद्म मिळणे हे निश्‍चितच भूषणास्पद असून, त्याचे श्रेय आईवडिलांनाच जाते.''

शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्‍वरशेठ चोरडिया म्हणाले, ""कृषिमंत्री असताना दहा वर्षांत अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यावर पवार यांनी भर दिला. देशात त्याआधी अन्नधान्याची आयात करावी लागत होती. अन्नधान्य उत्पादनात मागे असलेला देश पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच आता त्यांची निर्यात करू लागला आहे. पन्नास कोटी गोरगरिबांना शंभर रुपयांत 35 किलो धान्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या कामाचा हा सन्मान आहे. एकाच घरातील तीन जणांचा राष्ट्रीय गौरव होणे ही राज्याच्या दृष्टीनेही अभिमानास्पद बाब आहे.''

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी म्हणाले, ""पवार यांचा या सन्मानाने गौरव होणे ही अगदी समर्पक बाब आहे. त्यांचे कार्य तितके उत्तुंग आहे. त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. शेतीपूरक उद्योग, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन त्यांनी दिला. नवनवीन प्रयोग करणे आणि असे प्रयोग करणाऱ्यांना पवार यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे ते उत्कृष्ट समुपदेशक आहेत. अशा माणसाचे "पद्मविभूषण' या नागरी सन्मानाने कौतुक होणे योग्य आहे. अष्टपैलू असलेल्या पवार यांनी क्रीडा क्षेत्रापासून सहकारापर्यंतच्या अनेक क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सक्रिय राजकारणाची पन्नास वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचा हा गौरव होत आहे. त्यांना उद्योगाची अचूक जाण आहे. उद्योगांना काय लागते, तो कसा पुढे गेला पाहिजे, याची नेमकी माहिती आहे. त्यांनी सहकारी चळवळीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.''

क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर म्हणाले, ""गेली 50 वर्षे संसदीय प्रणालीत शरद पवार हे अविरतपणे काम करीत आहेत. शेती क्षेत्रातील त्यांचे योगदान, लातूर येथील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन आणि मुंबईतील दंगली आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांनी केलेले मोलाचे काम महत्त्वपूर्ण ठरले. त्यांना हा सन्मान मिळणे म्हणजे अतिशय आनंदायी आणि अभिनंदनाची गोष्ट आहे.''

अन्नधान्याची दुसरी क्रांती घडवणारा नेता
कृषिमंत्री म्हणून काम करताना दहा वर्षांत शरद पवार यांनी अन्नधान्याची दुसरी क्रांती घडवली. अनेक उत्पादनांत देश जगात प्रथम क्रमांकावर आला. त्यात गहू, तांदूळ, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यांचा प्रामुख्याने समावेश होता. आपत्ती व्यवस्थापनात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या संस्थेचे प्रमुखपद तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिले. राजकीय क्षेत्रात त्यांनी सलग पन्नास वर्षे कामगिरी केली आहे. या मुद्यांमुळे पवार यांना "पद्मविभूषण' देणे औचित्यपूर्ण आहे, असे मत त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com