व्यवसायांतून ओळख निर्माण करणारा समाज

व्यवसायांतून ओळख निर्माण करणारा समाज

आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चेत आलेला वीर गुर्जर समाज. मूळचा राजस्थानचा. शेती हा पिढीजात व्यवसाय. परंतु देश-विदेशात कामानिमित्त स्थिरावलेल्या या समाजातील नागरिकांनी तेथील भाषा आणि संस्कृतीही आपलीशी करून घेतली. पुण्यातही गुर्जर समाजाचे नागरिक राहतात. मात्र कोणाचा मिठाईचा, तर कोणी किराणा दुकानदार, कोणी मार्बलच्या व्यवसायात, तर कोणी स्टेशनरीमध्ये कार्यरत असल्याने, व्यवसाय हा त्यांचा पिंड आहे.

राजस्थानातून विविध समाजांचे नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. प्रत्येक समाजाने त्यांचे वैशिष्ट्य, आगळेवेगळेपण कायमच जपले आहे. परंतु राजस्थानचे असल्याने बहुतांश सण-उत्सव, रीतिरिवाज त्या त्या समाजाशी मिळते जुळते आहेत. गुज्जर, गुजर, गोजर, गुर्जर आणि वीर गुर्जर या नावानेही हा समाज ओळखला जातो. हा राजस्थानातला प्रतिष्ठित समाज होय. अगदी उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्येही समाजाचे नागरिक स्थिरावलेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रगीतात गुर्जर समाजाचा उल्लेख आढळतो, असे या समाजाचे नागरिक अभिमानाने सांगतात. 
पुण्यात या समाजाची लोकसंख्या फारच मर्यादित आहे. मागील तीन-चार पिढ्यांपासूनही काहीजण येथेच स्थायिक झाले आहेत. आर्थिक परिस्थितीनुसार काही जणांनी येथे घरे घेतली आहेत, तर काहीजण राजस्थान ते पुणे असे येऊन जाऊन करतात. नोकरीमध्ये फारसे ही मंडळी दिसणार नाहीत. व्यवसाय कोणताही असो, तो चिकाटीने ते करतात. अर्थात, त्यांच्याकडे ती अंगभूत कला आहे. अगदी जिद्दीने ते व्यवसाय करतात. मुन्डण, ओस्तरा, बसोवा, चेची, मुन्डी, धांगड, छछीयार, हाकला, मिणदार, सलेम्पुर, खटाणा, बैसला, बजाड, अधाना यांसारखी आडनावे वाचण्यात किंवा कानावर आली, की या समाजाची आपसूकच ओळख होते. 
भगवान देवनारायण हे त्यांचे आराध्य दैवत. माघ शुद्ध षष्ठीला देवनारायण भगवान यांची जन्मतिथी ते आनंदाने साजरी करतात. उपवास, धार्मिक परंपरेप्रमाणे पूजा-अर्चा असते. भजन आणि महाप्रसादही असतो.

देवनारायण भगवान यांच्या घोड्याची जन्मतिथीदेखील साजरी करण्याची त्यांच्याकडे पद्धत आहे. भादव्यातील (म्हणजे भाद्रपद) शुद्ध षष्ठीला घोड्याचा जन्मतिथी असते. संत भोलारामजी महाराज यांचेही ते उपासक आहेत. राजस्थानचे असल्याने, अन्य समाजांप्रमाणे महिलांचा गणगौर उत्सवात सक्रिय सहभाग असतो. सुंदराकांड वाचन करतात. महाराष्ट्रात राहत असल्याने, येथील प्रथा, परंपरांशी त्यांनी स्वतःला जुळवून घेतले आहे. अगदी मकर संक्रांतीपासून ते दसरा-दिवाळीपर्यंत सर्वसणांमध्ये ते उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सवात काहींच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापनाही होते.

बदलत्या काळाप्रमाणे आत्ताची पिढीही बदलू लागली आहे. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, सीए यांसारख्या विविध शाखांमध्ये तरुण-तरुणी शिक्षण घेत आहेत. समाज छोटा असल्याने त्यांची येथे स्वतंत्र शिक्षण संस्था, सार्वजनिक रुग्णालये नाहीत. राजकारणातही फारसे कोणी नाही. येथेच राहत असल्याने मराठी भाषा बहुतेकांना अवगत झाली आहे. पण अजूनही पुष्कळसे नागरिक हिंदी, मारवाडी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात.
वीर गुर्जर समाज पुणे या संस्थेने कात्रज येथे सहा गुंठे जागेत देवनारायण भगवान यांचे मंदिर बांधले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मंदिराला भेट दिली होती. वीर गुर्जर समाजाची हडपसर येथेही एक संस्था कार्यरत आहे. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ही मंडळी एकत्र येत असतात. वीर गुर्जर समाज पुणेचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, वीर गुर्जर समाज, हडपसरचे अध्यक्ष मांगीलाल गुर्जर यासारखी मंडळी सामाजिक कार्यात सक्रिय असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com