जवानांचे शौर्य स्मारक उभारणार

वैशाली भुते
गुरुवार, 23 मार्च 2017

पिंपरी - भारतात 23 मार्च हा "हुतात्मा दिन' म्हणून साजरा केला जातो. क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतिवीरांप्रमाणेच भारताच्या सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांच्या शौर्यकथांचा प्रसार व्हायला हवा, अशी गरज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांच्या या भावनिक आवाहनाने प्रेरित झालेल्या नितीन चिलवंत यांनी त्याला कृतीतून प्रतिसाद दिला. नव्हे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये देशभक्ती चेतविणारे "अमर जवान स्मारक' आणि "कारगील शौर्य स्मारक' उभारले जावे, असे स्वप्न बाळगले आहे. भक्तीशक्ती शिल्पामुळे शहराची वेगळी ओळख आहे. अमर जवान आणि कारगील शौर्य स्मारकामुळे ती अधिक ठळक होईल, असा चिलवंत यांना विश्‍वास आहे.

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरील चौकामध्ये अमर जवान स्मारक उभारण्यात आल्यास त्याला आगळेवेगळे महत्त्व राहील. चिंचवड येथील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे "कारगील शौर्य स्मारक' उभारल्याने सायन्स पार्कला भेट देणाऱ्यांमध्ये देशसेवेची भावना रुजेल. या स्मारकाच्या ठिकाणी रणसंग्रामाचा इतिहास सचित्र स्वरूपात उलगडून दाखविल्यास आपल्या महानगराच्या नावलौकिकात भर पडेल, असेही त्यांचे मत आहे.

मोदी यांनी "मन की बात'मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चिलवंत यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये सोशल साइटच्या माध्यमातून अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा प्रसारित केल्या आहे. "दि प्राइड ऑफ इंडिया' या ब्लॉगमधून भारतीय सैनिकांविषयीची माहिती दिली आहे. तसेच कारगील रणसंग्राम, आमचे खरे हिरो, भारतीय शूरवीर सैनिक, कारगील जवान आदी लेख लिहूनही त्यांनी नागरिकांमध्ये देशाविषयीचा जाज्वल्य अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. देश रक्षणासाठी सीमेवर ज्या 545 सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांच्याविषयीची माहिती देण्याचे मोलाचे काम चिलवंत यांनी केले आहे. तसेच भारतीय लष्कर, सैन्यदल, युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांची भूमिका, घोषवाक्‍य अशी विविध प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. हे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा संकल्पही चिलवंत यांनी केला आहे.

Web Title: soldiers memorial set up courage