बाप्पाच्या आगमनाची मावळात तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

सोमाटणे - पवनमावळात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने नफा घटणार असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

सोमाटणे - पवनमावळात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने नफा घटणार असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

पवनमावळातील आढले, गहुंजे, ढोणे, सोमाटणे, चांदखेड येथील मूर्तिकार मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार करतात. गणेश मूर्ती तयार करण्यास मे महिन्यात सुरवात झाली असून सध्या कारखान्यात प्रत्येकी एक ते दोन हजार मूर्ती तयार आहेत. मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात रंगरंगोटीचे व फिनिशिंगचे काम पूर्ण होणार आहे. जीएसटीमुळे गणेश मूर्ती तयार करण्यास लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींकारांच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

याबाबत गहुंजे येथील मूर्तिकार संदीप कुंभार म्हणाले, ‘‘पवनमावळातील गणेश मूर्ती देहूरोड, पिंपरी-चिंचवड व स्थानिक बाजारपेठेत विकल्या जात असल्याने मूर्तीच्या किमतीत फार वाढ करता येत नाही. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने तयार करण्याचा खर्च वाढला आहे. मात्र, विक्रीची किंमत फारशी वाढवता येत नसल्याने मिळणारा नफा यावर्षी कमी होणार आहे.’’
यावर्षी दोन हजार मूर्ती तयार केल्या असून त्यांची किंमत शंभर रुपयांपासून ते दहा हजारापर्यंत आहे. चार माणसाच्या पाच महिन्यांच्या कष्टातून खर्च वजा जाता तीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. वर्षभरातील हे उत्पन्नाचे हे एकमेव साधन असल्याने वर्षाचा खर्च यातूनच भागवावा लागतो, असेही ते म्हणाले.

वडेश्‍वर परिसरातही लगबग
टाकवे बुद्रुक - वडेश्वर (ता. मावळ) येथील कुंभारवाड्यात गणपती मूर्ती बनविण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या २५ दिवसांवर गणरायाचे आगमन आले आहे. परिसरातील १५ ते २० गावांतील गणेशभक्त मूर्तीच्या आगाऊ नोंदणीसाठी येथील कुंभारवाड्यात हजेरी लावता आहेत. त्याअनुषंगाने मूर्ती बनविण्याची कामांची लगबग सुरू आहे.

शेवटचा हात फिरवला जात असून, मूर्तींना उठावदार दिसायला त्यावर हिरे, कापडाची, खड्यांची लेस लावली जात आहे. वेलवेट पेंटिंग, फ्लोरेसन्स कलर, मेटॅलिक पद्धतीने रंगकाम करत असल्याचे पांडुरंग दरेकर आणि संतोष दरेकर यांनी सांगितले.

मूर्तींच्या किमतीत वाढ
रंग, माती, सजावट साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे येथील कुंभारवाड्यात सुमारे ७०० गणपती मूर्ती बनविल्या आहेत. दरेकर परिवारातील मनीषा दरेकर, चंद्रभागा दरेकर, शीतल दरेकर या कामात मदत करत आहेत. अनंता कशाळे हा स्थानिक युवकही रंगकामात तरबेज असल्याने या कामात सध्या मग्न आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुंभारवाड्यात या कामाची तयारी सुरू असून, साडेतीनशे रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या किमती आहेत.