पक्षात राहून काहींनी खंजीर खुपसला

पक्षात राहून काहींनी खंजीर खुपसला

राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत भोसरीच्या नेतृत्वावर टीका

पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकावर विश्‍वास ठेवला मात्र काही जणांनी राष्ट्रवादीचे खाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली, तर मंगला कदम यांनीही टीका करताना एक बिनविरोध निवडून देऊन त्यांना अख्खी भोसरी मिळणार होती का, असे विधान करीत भोसरीच्या नेतृत्वाकडे सूचक इशारा केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी (ता. २५) खराळवाडी येथील कार्यालयात आयोजित केली होती. त्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी उपमहापौर महंमद पानसरे, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना वाघेरे म्हणाले, ‘‘दादांनी कोणताही निर्णय घेताना येथील प्रत्येकावर विश्‍वास ठेवला. शहरातील पुढाऱ्यांनी आपल्या येथे राष्ट्रवादीच्या जिवावर सत्ता उपभोगली, खाल्ले आणि पाठीत खंजीर खुपसला. काही जण दुसऱ्या पक्षात गेले. याच लोकांना दादांनी सांगितले, की हा अमक्‍या गटाचा आहे, तो तमक्‍या गटाचा आहे. इंग्रज नीतिप्रमाणे भाजपने रणनीती आखली. आपलीच लोक त्यांनी आपल्या विरोधात लढण्यासाठी वापरली.

मात्र आपण हरलेलो नाही. नागरिकांनी दगा दिला नाही, भाजपने लक्ष्मीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला. महापालिका निवडणुकीत कोणी विरोधात काम केले हे मला चांगलेच माहिती आहे. त्यांनी स्वतःहून राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणे बंद करावे, अन्यथा मला सांगावे लागेल, की तुझी आम्हाला यापुढे गरज नाही.’’

मंगला कदम या भाजपवर टीका करताना म्हणाल्या, ‘‘आमच्या नेत्यांना ते बारामतीकर म्हणून हिणवत होते. आता आम्ही बघू की त्यांना निर्णय घेण्यासाठी पुण्याच्या पेठेत जावे लागते की मुंबईच्या साहेबांकडे. पुण्याच्या पगडीखाली जातात की नागपूरच्या संत्रीची सालं उचलतात. आम्ही शहराचा विकास केला हेच आमचे चुकले का, अशी विचारणा शहरवासीयांना करणार आहोत.’’

राष्ट्रवादीतील गद्दारांबाबत बोलताना कदम म्हणाल्या, ‘‘आदल्या दिवसापर्यंत आम्हाला त्यांनी अंधारात ठेवले. मात्र जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तोच त्यात पडतो हे लक्षात ठेवा. आमच्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या; पण आम्ही म्हणायचो, जाऊ द्या ना आज ते आपल्यात आहेत ना? भोसरीतील एक जागा बिनविरोध करून त्यांना काय अख्खी भोसरी मिळणार होती काय? अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार जाणीवपूर्वक दिले नाहीत. आपली सत्ता नसली तरी कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. रट्ट्याला फटक्‍याने उत्तर द्या. राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे.’’

साहेबांचा प्रमुख कार्यकर्त्यांना फोन
महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना फोन केला. आपण निवडणुकीत हरलो म्हणून खचून जाऊ नका. उठा, जोमाने कामाला लागा. पक्षाचे काम घराघरांत जाऊन पोचवा. २०१९ मध्ये आपल्याच पक्षाचा खासदार व्हायला पाहिजे,’’ अशा शब्दांत त्यांनी धीर दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

‘इव्हीएम’ तक्रारीचा पाठपुरावा करणार
इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या (इव्हीएम) काही तक्रारी आल्या आहेत. अनेक उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील लोकांची मते देखील मिळाली नसल्याचे समोर आले आहे. अनपेक्षितपणे काही लोकांना अधिक मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तक्रारीची योग्य ती दखल घ्यावी, तसेच जुन्या पद्धतीने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे असेही, संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातून इव्हीएम मशिन त्रुटीबाबत आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले. 

नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन
नवनिर्वाचित ३६ नगरसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि पराभवाची कारणे शोधण्यासाठी प्रभागात जाऊन बैठक घेण्यात येणार आहे. प्रभागातील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पराभवाची कारणे शोधण्यात येतील तसेच संघटन मजबूत करण्याचे दोन ठरावही मंजूर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com