शहरातील ध्वनिप्रदूषणाचे "मॅपिंग'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

पुणे -शहराच्या कोणत्या भागात कोणत्या वेळेला किती ध्वनिप्रदूषण होत आहे. विशेषतः गणेशोत्सवात 10 दिवसांतील शहराच्या विविध भागांतील परिस्थिती काय आहे, याची "मॅप‘ स्वरूपातील माहिती आता कोणालाही "रिअल टाइम‘ मिळेल. 

 

पुणे -शहराच्या कोणत्या भागात कोणत्या वेळेला किती ध्वनिप्रदूषण होत आहे. विशेषतः गणेशोत्सवात 10 दिवसांतील शहराच्या विविध भागांतील परिस्थिती काय आहे, याची "मॅप‘ स्वरूपातील माहिती आता कोणालाही "रिअल टाइम‘ मिळेल. 

 

गुगल मॅप्सवर ज्याप्रमाणे कोणत्याही परिसरातील वाहतुकीच्या कोंडीचे चित्र "लाइव्ह‘ दिसते त्याचप्रमाणे ध्वनिप्रदूषणाची पातळी "पुणे नॉईज पोल्यूशन मॉनिटर‘ या ऍप्लिकेशनद्वारे समजू शकेल. त्यासाठी लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचा वापर केला आहे. लाल रंगाचा अर्थ ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक आहे, तर हिरव्याचा अर्थ पातळी समाधानकारक आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करता येईल. 

 

ऍप्लिकेशन तयार करणाऱ्या "मिन्ट सोल्यूशन्स‘चे संस्थापक उदय कोठारी म्हणाले, ""ऍप्लिकेशनचा वापर कुठेही आणि कोणीही मोफत करू शकतो. मात्र, आम्ही सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अतिरिक्त "डेटा चार्ज‘ पडत नाही; तसेच, ऍप्लिकेशनमधून कोणतीही वैयक्तिक संवेदनशील माहिती काढून घेतली जात नाही. यूझरच्या दृष्टीने सोपे आणि सुरक्षित ऍप बनविले आहे.‘‘ 

 

""गणेशोत्सव सुरू झाल्याने आमची टीम शहराच्या विविध भागांतील प्रमुख मंडळांच्या परिसरात ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजणार आहे. सामान्य नागरिक त्याच्या मोबाईलवर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून आमच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. कोणत्या परिसरात किती ध्वनिप्रदूषण आहे हे नोंदविताना यूझरची ओळख गोपनीय ठेवली जाते,‘‘ असेही कोठारी यांनी स्पष्ट केले. 

 

""जेवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक ऍप्लिकेशनचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणच्या ध्वनी पातळीची नोंद ठेवण्यात मदत करतील तेवढा ध्वनिप्रदूषणाचा "मॅप‘ तपशीलवार मिळण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवातच नव्हे, तर त्यानंतरही त्यांच्या निवासाच्या तसेच कार्यालयात जातानाचा मार्ग व अन्य ठिकाणी ऍप्लिकेशनचा वापर करावा,‘‘ असे आवाहन कोठारी यांनी केले आहे. 

 

ध्वनिप्रदूषणाची पातळी कशी समजेल? 

गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर पुणे नॉईज पोल्यूशन मॉनिटर म्हणून शोधल्यावर ते ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनसाठी सात एमबी मेमरी स्टोअरेज स्पेस आणि अँड्रॉईड 2.3 किंवा त्यापुढील व्हर्जन असावे लागेल. या ऍपमध्ये लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचा वापर केला आहे. लाल रंगाचा अर्थ ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकादायक तर हिरव्याचा अर्थ पातळी समाधानकारक आहे. त्यानुसार, ध्वनिप्रदूषणाची पातळी समजण्यास मदत होईल.

Web Title: Sound pollution in the city "Mapping"