‘स्पेशल बस’ महिलांसाठी सोईस्करच

‘स्पेशल बस’ महिलांसाठी सोईस्करच

पुणे - कॉलेजमध्ये शिकणारी सायली दररोज ‘महापालिका ते भेकराईनगर’ या मार्गावर पीएमपीने प्रवास करते... गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे त्रासलेल्या महिलांसाठी ‘पीएमपी’ने काही महिन्यांपूर्वी ‘स्पेशल बस’ सुरू केली... त्यामुळे सायलीसारख्या अनेकींचा प्रवास सोईस्कर झाला अन्‌ त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळू लागला ..., पण अचानक ही बस बंद झाली अन्‌ महिला- तरुणींची तारांबळ उडाली...

पीएमपीने महापालिका ते वारजे, शिवाजीनगर ते कात्रज, महापालिका ते भेकराईनगर (हडपसर), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (येरवडा) अशा चार मार्गांवर महिलांसाठी ‘स्पेशल बस’ मोठा गाजावाजा करत सुरू केली; पण त्यातील एक मार्ग सहा महिन्यांपासून बंद पडला आणि इतर तीन मार्ग सुरू असले, तरी त्यांच्या फेऱ्या अपुऱ्या पडतात; तसेच त्यातील एक बस संध्याकाळी सुटतच नसल्याचा अनुभव येतो.

महापालिका ते भेकराईनगर (हडपसर)  
बसथांब्यावरील महिलांबरोबर ‘सकाळ’ची महिला प्रतिनिधी येथे एक तास थांबली; तसेच त्या प्रवाशांचे अनुभवही ऐकले. ही बस सोईस्कर असल्याने बस बंद करण्याची गरज नव्हती, असे महिला प्रवाशांनी सांगितले. नोकरदार अनुराधा पुजारी म्हणाल्या, ‘‘हडपसरला जाणाऱ्या बसमध्ये नेहमी गर्दी असते, त्यामुळे महिला आणि तरुणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही महिन्यांपूर्वी या मार्गावर सुरू असणारी महिलांसाठीची स्वतंत्र बस सोईस्कर होती. ही बस पाच वाजून ३५ मिनिटे किंवा पाच वाजून ४५ मिनिटांनी असायची. मात्र, सध्या ती या मार्गावरून धावत नाही, ती पुन्हा सुरू करावी.’’ विद्यार्थिनी सायली कांबळे म्हणाली, ‘‘महिला राखीव बस बंद केल्याने अडचणी येत आहेत. संध्याकाळच्या वेळी घरी जायला ही बस सोईस्कर होती.’’

महापालिका ते वारजे माळवाडी 
कॉलेज सुटल्यावर धावत-पळत आम्ही ही बस पकडतो. महिलांसाठी स्वतंत्र बस असल्यामुळे ‘रिलॅक्‍स’ वाटते. मात्र, या बसच्या फेऱ्या वाढवायला हव्यात, असे रसिका देशपांडे सांगत होती. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या मार्गावरून ही बस धावते. ‘‘अनेक दिवसांपासून आम्ही या बसने प्रवास करत आहोत. बसमध्ये चालक- वाहक सोडला, तर सगळ्या महिलाच असतात. सर्वसाधारण बसमधून प्रवास करताना नकोसे स्पर्श, नको असलेल्या नजरा, हे सहन करावे लागते. मात्र, या बसमध्ये सुरक्षित वाटते,’’ असे रसिका आणि अश्‍विनीने सांगितले. सायली देशमुख म्हणाली, ‘‘खरंतर इतर मार्गांवरही मागणीनुसार महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करणे आवश्‍यक आहे.’’  दरम्यान, या बसच्या मार्गात लागणाऱ्या अनेक स्थानकांवर वेगवेगळ्या वयोगटातील पुरुष मंडळी या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. मात्र, चालक आणि वाहक ‘ही बस फक्त महिलांसाठीच आहे’, असे सांगत असल्याचे निदर्शनास आले.

कात्रज ते शिवाजीनगर 
या मार्गावरील बसही नियमित सुरू असून, तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कामाच्या वेळेत या बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या जास्त असते. शिवाजीनगर बसस्थानकातील नियंत्रक संजय जेजुरकर म्हणाले, ‘‘कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर महिलांसाठी सकाळच्या सत्रात सात आणि संध्याकाळच्या सत्रात सात अशा १४ बसेस असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. रेल्वेने पुण्यात येणाऱ्या अनेक महिला या बसने ये-जा करतात.’’ या मार्गावर महिलांसाठी स्पेशल बस आहेत. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बसच्या फेऱ्या कमी आहेत, असे विशाखा जाडेकर या विद्यार्थिनीने सांगितले. नेत्राली येवले म्हणाल्या, ‘‘या मार्गावरील महिला स्पेशल बसची संख्या कमी आहे. या बसेसच्या फेऱ्या वाढवायला हव्यात. तसेच, बसच्या वेळेचा फलक येथे लावावा.’’

कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड 
कात्रज आगाराचे नियंत्रक रामचंद्र दिवे म्हणाले, ‘‘या मार्गावर महिला विशेष बससेवा सकाळच्या सत्रात आहे. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी ही बस सुटते. तिची एकच फेरी असते. एरवी या बसला चांगला प्रतिसाद असतो; मात्र आता शाळांना सुट्या असल्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी आहे.’’ याच बसने दररोज प्रवास करणाऱ्या वंदना घुले म्हणाल्या, ‘‘या बसची वाट पाहावी लागत नाही. क्वचितच ही बस थोडीफार उशिरा येते. सर्वसाधारण बसमध्ये पुरुषांमुळे होणाऱ्या धक्काबुक्कीपेक्षा ही बस महिलांसाठी सुरक्षित आहे.’’ नयना मोरे म्हणाल्या, ‘‘ही बस सकाळीच असल्याने प्रवास सुकर होतो. मात्र, या मार्गावर संध्याकाळच्या वेळीही बस सुरू करावी.’’

पीएमपी म्हणते बस सुरू आहे...
महापालिका- भेकराईनगर मार्गावरील बस बंद असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. मात्र, पीएमपीच्या म्हणण्यानुसार या मार्गावर सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी महिलांसाठी राखीव बस सुरू आहे. ‘‘या मार्गावर सकाळी एक आणि सायंकाळी एक अशा फेरीत ही स्पेशल बस सुरू आहे. ही बस नियमित असते, त्याची नोंदही आमच्याकडे आहे,’’ असा दावा भेकराईनगर आगाराचे व्यवस्थापक नारायण भांगे यांनी केला. मात्र, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सलग दोन दिवस केलेल्या पाहणीत ही बस सुरू असल्याचे आढळून आले नाही.

सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी ही बस वारजे माळवाडीच्या बस स्थानकावरून सुटते. त्या वेळी माळवाडीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमी असते. कर्वेनगरला ही बस आल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढायला सुरवात होते. मात्र, सायंकाळी महापालिकेच्या समोरील स्थानकांवरून बस सुटतानाच ही बस पूर्ण भरलेली असते. तीन वर्षांपासून ही बससेवा सुरू आहे. दररोज या बसने अंदाजे १०० ते १५० महिला प्रवास करतात.
- चंद्रकांत वरपे, व्यवस्थापक, कोथरूड आगार

महिलांच्या मागण्या 
नियोजित मार्गावरील बसच्या फेऱ्या वाढवाव्यात.
कार्यालये, शाळा, महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बस असाव्यात.
महापालिका ते भेकराईनगर (हडपसर) या मार्गावरील बंद पडलेली ‘महिला स्पेशल बस’ पुन्हा सुरू करावी.
सांगवी, निगडी, चिंचवड या मार्गांवरही महिलांसाठी बस सुरू करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com