दाभोलकर खूनप्रकरणी स्पेशल टास्क फोर्स नेमा - डॉ. हमीद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पुणे - ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर, विनय पवार अद्यापही फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘स्पेशल टास्क फोर्स’ नेमावा, जात पंचायतविरोधी कायदा मंजूर करावा,’’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ४५ महिने झाले. परंतु अद्यापही सरकार गुन्हेगारांपर्यंत पोचू शकले नाही. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रात अकोलकर, पवार हे दोघेही डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी असल्याचे म्हटले आहे. ते दोघेही सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीशी संबंधित आहेत. या प्रकरणी अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार आशिष खेतान यांना धमकीचे पत्रे आले आहे. सरकार आरोपींना पकडू शकले नाही म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे खून झाले,’’ असे हमीद म्हणाले.

‘‘वीरप्पनला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सचा उपयोग झाला होता. अकोलकर, पवार यांचे साथीदार प्रवीण लिमकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हेही मडगाव बाँबस्फोटानंतर फरारी आहेत. कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. येत्या २० ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण होतील. त्यापूर्वी आरोपी पकडले जावेत,’’ अशी अपेक्षा डॉ. हमीद यांनी व्यक्त केली. दरम्यान, ओंकारेश्‍वर मंदिरासमोरील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी दहा ते अकरा दरम्यान ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदविला. ‘अंनिस’चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, निमंत्रक दीपक गिरमे, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव उपस्थित होते.

Web Title: special task force for dabholkar murder case