स्थायी समितीसाठी सोशल इंजिनिअरिंग? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - महापौर, उपमहापौर, सभागृहनेते निश्‍चित झाल्यावर आता स्थायी समितीचे अध्यक्षपद ठरविताना भारतीय जनता पक्ष "सोशल इंजिनिअरिंग'चा अवलंब करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

पुणे - महापौर, उपमहापौर, सभागृहनेते निश्‍चित झाल्यावर आता स्थायी समितीचे अध्यक्षपद ठरविताना भारतीय जनता पक्ष "सोशल इंजिनिअरिंग'चा अवलंब करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

महापौरपदासाठी ब्राह्मण समाजातून मुक्ता टिळक, उपमहापौरपदासाठी दलित वर्गातून नवनाथ कांबळे, नागरिकांच्या मागास वर्गातून (ओबीसी) श्रीनाथ भिमाले यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली आहे. भाजपमध्ये जातीच्या आधारे पदांवर नियुक्‍त्या केल्या जात नाहीत, असे नेते सांगत असले तरी, पक्षाला जातीय समतोल साधावा लागेल, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मराठा समाजातील नगरसेवकाची नियुक्ती होईल, असा अंदाज काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यातच पर्वती, कसबा आणि कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांना आता संधी मिळेल, असा संदर्भ काही कार्यकर्ते देत आहेत. दरम्यान, स्थायी समितीमधील दहा सदस्यांची निवड पक्षातर्फे येत्या चार दिवसांत निश्‍चित करण्यात येणार असून त्याची घोषणा 21 मार्चच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पुणे महापालिकेच्या 67 वर्षांच्या इतिहासात ब्राह्मण समाजास प्रथमच महापौरपद मिळाले आहे. जनसंघाचे अप्पासाहेब भागवत यांच्या हातातून 1967 मध्ये महापौरपद थोडक्‍यात निसटले होते. त्या वेळी कॉंग्रेसचे उमेदवार भाऊ कडू यांच्या विरोधात सर्व कॉंग्रेसविरोधक एकवटले होते. मात्र भागवत यांना 36 आणि कडू यांना 37 मते मिळाल्याने अवघ्या एका मताने भागवत यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विविध समाजांसाठीचे आरक्षण येईपर्यंतच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रदीर्घ कालखंडात मराठा आणि माळी समाजाकडे बहुतांश वेळा महापौरपद होते. अपवादांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे भाऊसाहेब चव्हाण हे 1957 मध्ये महापौर होते तर 1973 मध्ये त्याच पक्षाचे वा. रा. पाडाळे उपमहापौर होते. 

Web Title: Standing Committee for Social Engineering?