अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. 27) सुरू आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून, तीन फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. रविवारी (ता.29) साप्ताहिक सुटी असली, तरी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 21 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होईल.

पुणे - महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. 27) सुरू आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून, तीन फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. रविवारी (ता.29) साप्ताहिक सुटी असली, तरी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 21 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होईल.

ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून, सर्व आवश्‍यक कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्रासह स्वाक्षरी केलेले अर्ज संबंधित प्रभागांसाठी नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत ते स्वीकारण्यात येतील. चार फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार असून, सात फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन
महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी म्हणाले, ""अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली, तरी माघार घेण्याचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करावा लागेल. येत्या आठ फेब्रुवारीला चिन्हांचे वाटप होणार असून, याच दिवशी मतदान केंद्रनिहाय उमेदवारांची यादी जाहीर होईल.''

प्रचार सभांसाठी 294 जागा निश्‍चित
निवडणूक काळातील प्रचार सभांसाठी शहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेच्या भूमीजिंदगी विभागाच्या ताब्यातील 294 जागा निश्‍चित केल्या असून, त्याची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर दिली आहे. शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बुधवारी बैठक घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासह सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती दिल्याचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

अन्य जागांसाठी परवानगी आवश्‍यक
निश्‍चित केलेल्या जागेचे एक दिवसाचे भाडे आकारण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्याला प्राधान्य राहील. तर, खासगी मालकीच्या जागेत सभा घ्यायची असल्यास संबंधित संस्था/व्यक्ती यांचे संमतिपत्र सादर करणे आवश्‍यक असेल. रस्ते आणि चौकांमधील कोपरा सभांकरिता पोलिस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्‍यक राहणार आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन दाखल करावा लागणार असला, तरी "एबी फॉर्म' मात्र उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल. एकाच पक्षाकडून दोन उमेदवारांना "एबी फॉर्म' दिले जातात. त्यात पहिला फॉर्म सादर करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज त्या पक्षाचा अधिकृत असेल.
- सतीश कुलकर्णी, निवडणूक अधिकारी, महापालिका