टाक्‍यांच्या कामाला स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - शहरातील नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या कामाला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने गुरुवारी स्थगिती दिली, त्यामुळे या टाक्‍यांची कामे आता थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाक्‍यांच्या कामाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

पुणे - शहरातील नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या कामाला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने गुरुवारी स्थगिती दिली, त्यामुळे या टाक्‍यांची कामे आता थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाक्‍यांच्या कामाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

नागरिकांना 2018 पर्यंत चोवीस तास समान शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 2 हजार 818 कोटी रुपयांची योजना महापालिका प्रशासनाने आखली आहे. त्यात, सुमारे दोन हजारांहून अधिक किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्याचे नियोजन असून, पाण्याची साठवणक्षमता वाढविण्याकरिता विविध भागांत 103 टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. त्यातील 83 टाक्‍यांची कामे करण्याचा निर्णय झाला असून ती कामे सुरू आहेत. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आहे. मात्र, या कामासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत, आमदार अनिल भोसले यांनी टाक्‍या उभारण्याच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी अधिवेशनात केली होती. या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री 

रणजित पाटील यांनी केली होती. त्यानुसार या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""पाण्याची साठवणक्षमता वाढविण्यासाठी टाक्‍यांची कामे वेगाने होणे अपेक्षित आहे, त्यानुसार कामे सुरू होती. मात्र, त्याला स्थगिती मिळाली आहे.'' 

राष्ट्रवादी आक्रमक 
पुणेकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, केवळ राजकीय सूडापोटी राज्य सरकारने टाक्‍यांच्या कामाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेणार असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिला. 

Web Title: Stay build water tanks