टोल कर्मचाऱ्यांची मनमानी थांबवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. नजीकच्या गावांसह कात्रज परिसरातील रहिवाशांना असलेल्या सवलतींबाबत नियम असलेला फलक आणि कागदपत्रांची माहिती ठळक अक्षरात लावण्याची मागणी केली आहे.

टोल नाक्‍यावरील कर्मचारी अर्वाच्य भाषा वापरत वाहनचालकांना वाईट वागणूक देत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केल्यास स्थानिक पोलिसही दुर्लक्ष करतात. दोघेही संगनमताने लूट करत असल्याचा अनुभव काही दिवसांपूर्वीच नागरिकांना आला आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस आणि टोल कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर म्हणाले, ‘‘ज्या रस्त्याच्या कामासाठी खेड शिवापूर टोल नाक्‍यावर शुल्कवसुली केली जाते ते काम मार्च २०१३ मध्ये संपणे अपेक्षित होते. मात्र, त्याला वेळोवेळी मुदतवाढ दिल्याने ही वसुली नेमकी कोणासाठी व का केली जाते, हा मोठा प्रश्‍न आहे.’’

नागरिक कुमार शिंदे म्हणाले, ‘‘वाहनचालकांचे म्हणणे ऐकून न घेता हे कर्मचारी स्वतःचे नियम लादतात. त्यामुळे वादावादी होते आणि नागरिकांना अकारण मानसिक त्रास होतो.’’ अग्निशामक दलातील जवान नीलेश महाजन म्हणाले, ‘‘टोल नाक्‍यावरील कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांकडून झालेली अरेरावीची घटना खेदजनक आहे. याविरोधात नागरिकांनी लढले पाहिजे.’’ लोकहित फाउंडेशनचे अजहर खान म्हणाले, ‘‘स्थानिक पोलिस, कर्मचारी हे टोल कंत्राटदाराच्या हातातील बाहुले असल्यासारखे वागतात. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही धुडकावला जातो.’’ ‘मेरे अपने’ संस्थेचे बाळासाहेब रुणवाल म्हणाले, ‘‘सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि पिळवणूक थांबली पाहिजे. व्यवस्थेला लागलेली कीड सगळ्यांनी एकत्र येऊन साफ केली पाहिजे.’’