दगडखाणींतील उत्खनन बंद 

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 10 मे 2017

गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्खनन, त्याचा नागरिकांना होत असलेला त्रास, मुरुम व वाळूची होत असलेली अवैध वाहतूक याची गंभीर दखल घेत महसूल प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध विलंबाने का होईना सोमवारी दिवसभर मोठी कारवाई केली.

पिंपरी : गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्खनन, त्याचा नागरिकांना होत असलेला त्रास, मुरुम व वाळूची होत असलेली अवैध वाहतूक याची गंभीर दखल घेत महसूल प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध विलंबाने का होईना सोमवारी दिवसभर मोठी कारवाई केली. चऱ्होली, मोशी या भागातील दगडाच्या खाणींतील 29 क्रशरच्या वीजजोडण्या तोडण्यात आल्या. त्यामुळे या दगडांच्या खाणींतील उत्खनन बंद पडले आहे. 
चऱ्होली, मोशी, चोविसावाडी या परिसराची मंगळवारी पाहणी केली असता, त्या भागात मोठमोठ्या खाणी असून, तेथील क्रशर पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. कोठेही काम सुरू नसल्याने त्या परिसरातून दगड व मुरुम वाहून नेण्याचे काम बंद पडले होते. जमिनीपासून पन्नास ते शंभर फुटांपेक्षा जास्त खोलीच्या खाणी तेथे रस्त्यालगत खोदल्याचे दिसून येते. 

हवेलीच्या अपर तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी शनिवारी रात्री काही खाणींविरुद्ध कारवाई केली. त्या सोमवारी पहाटे चार वाजता पथकासह या भागात पोचल्या. राहिलेल्या खाणींत सुरू असलेले खोदकाम बंद करण्यासाठी तेथील क्रशरच्या वीजजोडण्या बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणचा वीजपुरवठा बंद केला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

महापालिकेच्या ताब्यातील शासकीय गायरानाच्या ठिकाणीही उत्खनन होत असल्याचे त्यांना आढळून आले. आळंदी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यालगतच्या लहान टेकडीचा काही भाग नियोजित रस्त्यामध्ये आहे; मात्र तेथे कंत्राटदारांनी डोंगराचा मोठा भाग खणल्याचे दिसून आले. तेथेही शिर्के यांच्या पथकाने कारवाई केली. तेथील उत्खनन आता बंद झाले आहे. 

शिर्के यांच्याकडे या कारवाईसंदर्भात विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, ""दगडाच्या खाणीतून उडत असलेल्या भुकटी तसेच मातीमुळे या भागात प्रदूषण वाढल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. त्याबाबतची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाईल. या तक्रारीची दखल घेत आम्ही मोशी, चऱ्होली या परिसरातील खाणींची पाहणी केली. काही क्रशरना परवानगी आहे, काही क्रशर अवैधरीत्या सुरू होते. खाणमालकांकडील कागदपत्रांची तपासणी करत आम्ही या भागातील 29 क्रशरच्या वीजजोडण्यांचा पुरवठा बंद केला.'' 

"सरकारी जमिनीवरील या खाणींना महसूल विभागाकडून खाणपट्टा देण्यात येतो. काही खाणमालकांनी खाणपट्टा नूतनीकरणासाठी अर्ज दिल्याचे सांगितले. खाणीतून किती उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे, त्यांनी नक्की किती उत्खनन केले, त्याची तपासणी केल्यानंतर समजणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक टोटल स्टेशन (इटीएस) या यंत्राद्वारे ते मोजले जाते. खाणकाम केलेल्या गौण खनिजांची रक्कम त्यांनी शासनाकडे जमा केली आहे का, ते पाहावे लागेल. त्याबाबतची योग्य ती कागदपत्रे सादर करण्यास खाणमालकांना सांगितले आहे. तोपर्यंत येथील 29 क्रशर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तेथील जागेचे पंचनामे करण्यात आले आहेत,'' असे शिर्के यांनी सांगितले. 
चऱ्होली फाटा येथील रिद्धीसिद्धी टॉवर येथील रहिवासी धनंजय जाधव यासंदर्भात तक्रार करताना म्हणाले,"त्यांच्या सोसायटीजवळच काही क्रशर असून, दगडाच्या खाणी खणण्याच्या वेळी त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे आम्हाला घराच्या खिडक्‍या, दरवाजे उघडणेही अवघड झाले आहे. परिसरातील सर्वच रहिवाशांना याचा त्रास होतो.'' 

खाणमालकांच्या संघटनेचे अध्यक्ष अमित भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिर्के यांना त्यांच्या म्हणण्याचे निवेदन दिले. दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या आठ गाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी चार गाड्यांवरील कारवाईतून दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, अन्य गाड्यांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे शिर्के यांनी सांगितले. 

Web Title: Stop the rock excavation

व्हिडीओ गॅलरी