कथा पोचतेय घराघरांत...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

व्यक्ती संस्थेतील तरुणाईचा घरोघरी, सोसायट्यांमध्ये उपक्रम

व्यक्ती संस्थेतील तरुणाईचा घरोघरी, सोसायट्यांमध्ये उपक्रम
पुणे - कथेचे भावविश्‍व वेगळेच... लहानपणी आजी- आजोबा झोपताना नातवंडांना कथा ऐकवायचे... काळानुरूप हे चित्र बदलत गेले अन्‌ कथा फक्त पुस्तकांपुरत्या मर्यादित राहिल्या. कथेचे हे भावविश्‍व आजच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा विडा आता "व्यक्ती' संस्थेतील तरुणाईने उचलला आहे. घराघरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये जाऊन कथा अभिवाचन करून लोकांना कथेच्या दुनियेचा अनोखा प्रवास ही तरुणाई "कथा आपल्या घरी' या उपक्रमातून करीत आहे.

व्यक्ती संस्थेतर्फे अनेक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत तरुणांसह अनुभवी कलाकारांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेतील सात जणांचा गट कथा अभिवाचन करण्यासाठी थेट सोसायटी व घराघरांमध्ये जाऊन कथांचे अभिवाचन करत आहे. घरातील हॉल, गच्चीवर हे अभिवाचन होत आहे.

लहान मुलांसाठी रवींद्रनाथ टागोर यांची "काबुलीवाला' ही कथा सादर करण्यात येते. संस्थेतील धनंजय सरदेशपांडे यांच्यासह सुयश झुंजुरके, वैशाली गोस्वामी, आदित्य बीडकर, अमेय महाजन, तेजश्री शिलेदार, वैभव पंडव, हेमंत फरांदे हे कथावाचन सादर करतात. लोक सहकुटुंब, शेजाऱ्या-पाजाऱ्यांसह हा कथावाचनाचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत कोथरूड, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरात अभिवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. महाविद्यालयीन तरुणांसह अनुभवी कलाकारांचा या गटात सहभाग आहे. धनंजय सरदेशपांडे लिखित "पाळी चुकली' या कथेसह संदेश कुलकर्णी यांच्या "मोंटूकलें दिवस' या पुस्तकातील कथा सादर करण्यात येत आहेत. संवाद, नाट्याभिनय आणि उत्कृष्ट सादरीकरणातून हे तरुण विनामूल्य कथांची सफर कथाप्रेमींना घडवत आहेत.

लोकांच्या वेळेनुसार घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासमोर कथा अभिवाचन करण्याचा अनुभव काहीसा वेगळाच आहे. त्यांना थेटरीत्या कथा ऐकायला मिळत असल्याने त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसादही चांगला असतो. कथावाचनाचा अनुभव खरंच खूप भन्नाट आहे.
- वैशाली गोस्वामी, कलाकार

कथांचे विश्‍व पोचविण्यासाठी घरी जाऊन आम्ही कथावाचन सादर करतो. अभिवाचन करणारे तरुणही त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. थेट घरी जाऊन कथावाचन करण्याचा अनुभव वेगळाच आहे.
- धनंजय सरदेशपांडे, कथाकार

लोकांसमोर कथा अभिवाचन करताना व्यक्ती संस्थेतील कलाकार.

Web Title: story get to home