#StrayDogs मोकाट कुत्र्यांची गणना आता सोपी

Stray-Dogs
Stray-Dogs

पुणे - शहरातील मोकाट कुत्र्यांची गणना करणे आता सोपे होणार आहे. नसबंदी आणि रेबीज लसीकरण केल्यानंतर या कुत्र्यांना बेल्ट लावला जाणार आहे. या सर्व कामासाठी चार संस्थांची तीन वर्षांच्या मदतीकरिता नियुक्ती केली आहे. याकरिता प्रतिकुत्र्यामागे १,०३९ रुपये इतका खर्च होणार आहे. 

याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्‍नावर गेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आयुक्तांनीदेखील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन सर्वसाधारण सभेत दिले होते. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला गेला.

युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ॲनिमल आणि ब्ल्यू क्रॉस सोसायटी या चार संस्थांना हे काम दिले जाईल. पहिल्या तीन संस्थांचे काम नायडू रुग्णालयाजवळ आणि ब्ल्यू क्रॉस सोसायटीचे काम केशवनगर - मुंढवा येथील केंद्रात चालेल. 

कुत्र्यांवर होणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी या केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कुत्र्यांच्या गळ्यात लेदर बेल्ट बांधले जातील आणि त्यामध्ये एक चीप बसविण्यात येणार आहे. यामुळे कुत्र्यावरील नसबंदीची माहिती उपलब्ध होईल, त्यांची गणना करणे सोपे होणार आहे. या बेल्टचा रंग हा प्रत्येक वर्षी वेगळा ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे वर्षानुसार माहिती मिळेल. त्याकरिता प्रति कुत्र्यामागे १ हजार ३९ रुपये इतका खर्च येणार आहे. एक ॲप तयार करणे, कुत्र्यांची गणना करणे यासाठी खर्चास मंजुरी दिली गेली आहे. या संस्थांची नियुक्ती २०२१ पर्यंत असेल.

इतर निर्णय 
मित्र मंडळ चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात अल्प दरात डायलिसिस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लायन्स क्‍लब ऑफ पूना आय फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ही सुविधा उपलब्ध होईल. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय, वानवडी येथील शिवरकर रुग्णालयापाठोपाठ ही सुविधा या दवाखान्यात मिळू लागेल. 

अभियांत्रिकी पदवीधरांची अनुभवाची अट शिथिल - बी.ई. सिव्हिल, बी. ई. इलेक्‍ट्रिकल पदवीधरांना महापालिकेची सुमारे ३० लाख रुपयांपर्यंतची कामे करण्यासाठी कंत्राटदार प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र देताना ठेवण्यात आलेली अनुभवाची अट शिथिल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली  गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com