मार्गदर्शन केंद्र बनली "टांकसाळ'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पश्‍चिम महाराष्ट्रात कोट्यवधींची उलाढाल; विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पॅकेज

पश्‍चिम महाराष्ट्रात कोट्यवधींची उलाढाल; विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पॅकेज
पुणे - लष्करपासून ते पोलिस भरतीपर्यंतचे मार्गदर्शन करणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे शंभर केंद्रांतून 40 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी दरवर्षी हजारो मुले या मार्गदर्शन केंद्रांची वेगवेगळी "पॅकेज' घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.

लष्कर, सीमा सुरक्षा दल, पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) येथे कनिष्ठ पातळीवर पदांच्या भरतीमध्ये मार्गदर्शन करणारी सुमारे शंभर मार्गदर्शन केंद्रे पश्‍चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये माहिती मिळाली. एकट्या फलटणासारख्या ठिकाणी सहा केंद्रे आहेत. या केंद्रामध्ये साधारणतः 30 ते 35 मुले प्रशिक्षण घेत असतात. तर पेपरफुटी प्रकरणात पुढे आलेल्या केंद्रांमधून 180 पर्यंत विद्यार्थी संख्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरमहा आठ ते दहा हजार असे एक पॅकेज आहे. यातून मुलांना आठ महिने प्रशिक्षण दिले जाते. यात वार्षिक पॅकेजचीही सोय केंद्रचालकांनी केली. वर्षभरासाठी एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज काही मुलांनी घेतले आहे. त्यात मुलांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केलेली असते. तसेच त्यांच्या भरतीसाठी आवश्‍यक शारीरिक तंदुरुस्तीची तयारी करून घेतली जाते.

त्यांच्याकडून लेखी परीक्षेचे मार्गदर्शन केंद्रात होते. त्यात विशेषतः गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान या विषयांची व्याख्याने होतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन यात केले जाते. संध्याकाळी परत व्यायाम, अशी बहुतांश मार्गदर्शन केंद्रांमधील दैनंदिनी असते, अशी माहिती यातील सूत्रांनी दिली.
पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून या केंद्रांची संख्या मोठी आहे. यापैकी काही केंद्रांची नोंद ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केल्याची पुढे आले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही केंद्रे सुरू झाली आहेत. या सर्व केंद्रांमध्ये तीन हजारांच्या दरम्यान मुलांची नोंदणी झाली आहे. यापैकी सुमारे साठ टक्के मुलांनी वार्षिक पॅकेज घेतले असून, 40 टक्के मुलांनी मासिक पॅकेजचा पर्याय निवडला आहे. या दोन्ही माध्यमांतून सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल या केंद्रांमधून होत असल्याची स्पष्ट झाले आहे.

सेवेबाबत प्रश्‍नचिन्ह
मार्गदर्शन केंद्रातून प्रशिक्षण घेऊन सैन्यात भरती झालेली काही मुले आहेत. मुले भरती होण्याचे प्रमाण वाढले तरच केंद्राची प्रसिद्धी होते आणि त्याची श्रेणी वाढते. अशा माध्यमातून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि ही मुले तंदुरुस्तीच्या निकषही पार करतात. त्यानंतर होणाऱ्या वैद्यकीय चाचणीतूनही ते पुढे जाऊन सैनिक म्हणून लष्करात भरती होतात. असे सैनिक किती निष्ठेने, देशसेवेचे व्रत घेऊन काम करतील या बद्दल मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.