ऊस तोडणी कामगारांच्या स्थलांतरित मुलांचा 'सांस्कृतिक महोत्सव'

dance
dance

सोमेश्वरनगर (पुणे) : एरवी उसाच्या फडात हरवून गेलेली मुलं आज मात्र, 'मस्तीभरे मनमे उडने की आशा' अशा गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करत होती. रोज गोवऱ्या थापणाऱ्या मुली 'ना काँटो मुझे बडा दुखता है' असे गाणे म्हणत 'शॅडो डान्स' पेश करत होत्या. तर वीटा थापण्यात मदत करणारा मुलगा 'उघड दार देवा आता...' अशी गायनातून आर्त साद घालत होता...

येथील सोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात ऊस तोडणी कामगारांच्या स्थलांतरित मुलांचा 'सांस्कृतिक महोत्सव' काल रात्री पार पडला. या महोत्सवातील वरील दृश्ये पाहून उपस्थित श्रोते तर भारावलेच पण या मुलांच्या आईबापाच्या डोळ्यात पाणी तरळले! या महोत्सवाने 'सोमेश्वर'च्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील सुमारे दोनशे मुलांना व्यासपीठ मिळवून दिले. हे कौतुक पाहण्यासाठी परिसरातील श्रोत्यांबरोबरच ऊसतोड मजूरही कामे आटोपून आले होते. रोज हातात कोयता असणाऱ्या आपल्याच मुलांची कला पाहून पालकवर्ग भारावून गेला होता.   

सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या 'आशा' प्रकल्पाच्या वतीने महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटन 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या हस्ते व संचालक महेश काकडे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी प्राचार्य वाय. जी. चव्हाण, केशव जाधव, नंदकुमार होळकर, ह. मा. जगताप, जयश्री मनोहर, आयेशा नदाफ, अनिल चाचर, योगेश ननावरे आदी उपस्थित होते. 

कारखाना तळावरील मुलांनी शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, डोंबारी नृत्य तसेच गोट्या रे गोट्या, बुवा कसे फसवतात या नाट्यछटा सादर केल्या. पाडेगाव तळावरील मुलांनी अग्गोबाई ढग्गोबाई, झिंगाट, ओ हमार चांदणी आदी नृत्ये सादर केली. पिसुर्टीतील मारूती वडजे या वीटभट्टीवरील मुलाच्या गायनाने लोक मंत्रमुग्ध झाले. मांडकीतील मुलांनी तुझ्या रूपाचं चांदण, छडी नका मारू गुर्जी या गाण्यांवर नृत्ये पेश केली. जेऊर तळावरील मुलांनी पैरो मे बंधन या गाण्यावर तर मांडकी तळावरील मुलांनी छम छम गाण्यावर नृत्य सादर केले. बजरंगवाडीच्या मुलांनी झिंगाट नृत्य तर लाटेच्या मुलांनी चंदाराणी हे बालनृत्य सादर केले. कोऱ्हाळे खुर्द व बुद्रुकच्या तळावरील मुलींनी देश रंगीला व पैरो मे बंधन है यावर नृत्य केली. करंजे तळावरील मुलांनी 'फ्युजन' सादर केले. दीपालीचा उखाणा, सुमन सुन्नीचे 'तू शायर है' वरील नृत्य व पाडेगावच्या राहुल सोनवणेचे 'हिरोपंती' वरील नृत्य यावर खुद्द 'सोमेश्वर'चे अध्यक्ष फीदा झाले.  

या मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे कलाप्रदर्शनही भरविण्यात आले होते. कोलाजकाम, स्प्रे पेंटींग, मार्बल पेंटींग, ग्रीटींग्ज, हातपंखे, कागदाची भांडी, कागदी टोप्या, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, वॅालपीस, अनुभवांची पुस्तके याची प्रदर्शनात रेलचेल होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com