उन्हाळी शिबिरांची चलती

representational image
representational image

पुणे : मुलांना उन्हाळ्याची सुटी लागली, की मामाच्या गावाला जायचे वेध लागतात. मात्र ही परंपरा बंद होत चालली आहे. कारण पालक मुलांविषयी जागृत झाले असून, वाढत्या स्पर्धेच्या युगात मुले अभ्यास आणि इतर कलागुणातही अग्रेसर असावीत यासाठी मुलांना उन्हाळी शिबिरांत पाठविण्याकडे पालकांचा कल वाढत असून, त्यामुळे या शिबिरांची चलती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

हे चित्र पाहता, उन्हाळ्यात विविध शिबिरांचे पेवच फुटले आहे. यामध्ये योगासन, बालसंस्कार वर्ग, साहसी क्रीडाप्रकारांसोबतच चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, स्वीमिंग, पारंपरिक आणि बॉलिवूड डान्स, गायन, मेहंदी, इनडोअर गेम्स, व्यक्तिमत्त्व विकास, बालनाट्य, संगीताचे क्‍लासेस अशा विविध शिबिरांचा यात समावेश आहे. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत या शिबिरांची गर्दी दिसते. 

शिबिराच्या संचालिका पूनम पुनदीर सांगतात, ''मुलांच्या परीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यापूर्वीच आमच्या शिबिरात बऱ्याच मुलांनी प्रवेश घेतला आहे. पालकही मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यासाठी येत आहेत. साधारण दोन आठवड्यांच्या शिबिरात मुलांना विविध खेळ, हस्तकला, निसर्गाची ओळख अशा अनेक गोष्टींचे आनंददायी प्रशिक्षण दिले जाते. मुलांनी केवळ टीव्ही आणि टेक्‍नॉलॉजीच्या आभासी दुनियेत न रमता काही कला अवगत कराव्यात, या विचाराने पालक या शिबिरांकडे आकर्षित होतात. 

साहसी शिबिरांच्या आयोजक भावना साहनी म्हणाल्या, ''या शिबिरांमध्ये सायकलिंग, ट्रेकिंग, टार्गेट शूटिंग, वॉटर राफ्टिंग, व्हॅली क्रॉसिंग, पॅराग्लायडिंग यांचा समावेश आहे. यामध्ये आठ ते सोळा या वयोगटातील मुले सहभागी होतात. याला मुंबई आणि पुण्यातून मोठा प्रतिसाद मिळतो. 

रोजच्या ठराविक चौकटीतून बाहेर येण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी शिबिरे मुलांना उपयुक्त असतात. तसेच सुट्यांमध्ये सातत्याने टीव्ही पाहणे किंवा मोबाईलमध्ये अडकण्यापेक्षा जीवनाचा आनंद घेत मार्गदर्शन मिळाल्यास ते मुलांच्या विकासासाठी उत्तम ठरते. 
- प्रेरणा देशमुख, पालक 

आमचा पूर्ण वेळ अभ्यास आणि क्‍लासमध्ये जातो. खेळण्यासाठीही वेळ मिळत नाही. आठवड्यातील दोन सुट्यांमध्येदेखील शाळा किंवा क्‍लासमध्ये एक्‍स्ट्रॉ लेक्‍चर असतात. त्यामुळे उन्हाळी शिबिरातून अभ्यासाव्यतिरिक्त विविध गोष्टींचे आनंददायी मार्गदर्शन मिळते. 
- नाज मुलाणी, विद्यार्थी 

सध्या कामाच्या व्यापामुळे पालकांचा नातेवाइकांकडे जाण्याचा कल कमी झाला आहे. त्यामुळे मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्‍न उपस्थित होतो. अशावेळी उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्यासाठी शिबिर हा पर्याय योग्य असतो. तसेच आपला मुलगा प्रत्येक क्षेत्रात पुढे असला पाहिजे अशी हल्लीच्या पालकांची मानसिकता असते. त्यामुळे मुलांना अशा शिबिरांत पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी मुलांची आवडनिवड पाहूनच त्याला योग्य शिबिराला पाठवावे. 
- मनजित संत्रे, मानसोपचारतज्ज्ञ 

दहा हजारांपर्यंत फी 
शहराप्रमाणेच उपनगरातदेखील शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केली जातात. यामध्ये लहान गट आणि मोठा गट यांचा समावेश असतो. शिबिराच्या कालावधीनुसार साधारणपणे हजार ते दहा हजारांपर्यंत फी आकारली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com